कसब्यात मशाल पेटविण्याचा शिवसेनेचा पुनरुच्चार

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मित्रपक्ष होते. या मैत्रीतून कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले. भाजपचे अनेक लाड पुरवले आहेत.

संग्रहित छायाचित्र

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मित्रपक्ष होते. या मैत्रीतून कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले. भाजपचे अनेक लाड पुरवले आहेत. आता कॉंग्रेसचे लाड केले जात आहेत. पुण्यातून कॉंग्रेसचा उमेदवार लोकसभेत जाणार आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघावर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चाच दावा असल्याचे गुरुवारी पुन्हा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच याची कल्पना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिली असल्याचेही सांगितले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुपारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर आज दिवसभर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. अखेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत या मागणीला दुजोरा दिला.

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही झाले तरी धंगेकर यांनी निवडून आणण्यासाठी आघाडीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेत बैठकांचा धडाका सध्या सुरू आहे. एका बैठकीत आम्ही लोकसभेला प्रचार करतो, कसबा विधानसभा मतदारसंघ आम्हाला द्या, अशी मागणी झाल्याने महाविकास आघाडीमध्ये आताच बिघाडी झाली की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र प्रचारच करणार नाही, असे कोणतेही वक्तव्य आमच्या पदाधिकाऱ्यांनी केले नाही. त्यामुळे विनाकारण कोणतीही अफवा पसरवण्यात येऊ नये, असे पदाधिकारी सांगत होते. मात्र कसबा मतदारसंघावर दावा ठाम असल्याचे ते ठासून सांगत होते.

कसबा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. या निवडणुकीत त्यांचा विजय होणार आहे. त्यामुळे ही जागा मोकळी राहणार आहे. या जागेसाठी शिवसेनेची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यामुळे या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर यांना ही गोष्ट सांगितली आहे. ठाकरे गटाची मशाल कसबा मतदारसंघात घरोघरी पोहचविण्याचे काम केले जाणार आहे.

 - संजय मोरे, शहर प्रमुख, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest