सर्पमित्रांनी केले सापाचे बाळंतपण; ७८ दिवस राखली अंड्यांची निगा
पुणे : एका घराजवळ निघालेला साप आणि त्याने घातलेली अंडी, तसेच त्यातून जन्मलेली नवजात पिल्ले (snake) यांना सर्पमित्रांनी जीवदान दिले. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. विशेष म्हणजे सापाने दिलेल्या अंड्यांना ७८ दिवस विशिष्ट वातावरणात ठेवण्यात आले होते. यातून जन्माला आलेल्या सर्व पिलांनाही जीवदान देण्यात आले. वन्यजीव रक्षक (Wildlife Protector) मावळ सर्पमित्र भास्कर माळी (snake friend) आणि अविनाश कारले यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केले.
तळेगाव दाभाडे येथील विद्या काशीद यांनी वन्यजीव रक्षक मावळ सर्पमित्र भास्कर माळी यांना फोन करून 'घराच्या जवळ एक साप असून पण त्याने काहीतरी खाल्लेले आहे. तो जागेवरून हालत नाही' असे कळवले. माळी यांनी अविनाश कारले यांना त्या ठिकाणी पाठवले. त्याठिकाणी तस्कर जातीचा बिनविषारी साप होता. तो साप अंडी देत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सापाला तिथेच ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिले असता सकाळी सापाने पूर्णपणे नऊ अंडी दिलेली होती. नंतर, त्या सापास नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले.
सापाची अंडी वनविभागात संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे यांच्यासोबतीने निगराणीमध्ये ठेवण्यात आली. विशिष्ट टेप्रेचरमध्ये ही अंडी ठेवण्यात आली होती. तब्बल ७८ दिवसांनी या अंड्यांमधून सर्व पिल्ले सुखरूप जिवंत बाहेर आली. या पिलांना विद्या काशीद, सर्पमित्र अविनाश कारले, भास्कर माळी, सुरज गोबी, वैभव वाघ यांनी मिळून नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.