संग्रहित छायाचित्र
पुणे : मुळा-मुठा नदी पात्रात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील नाईक बेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. नायडू मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी आणि नदी सुधारणेच्या नावाखाली नदीचा कमी झालेले पात्र याला जबाबदार असल्याची आरोप नागरिकांकडून केला जात होता. मुळामुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हाजारो माशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नाईक बेट परिसरातील नदीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. हे दुषित पाणी कुठुन आले याचा शोध घेतला जात आहे.
मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मृत जलचर प्राणी आणि माशांच्या खच सापड्याने पुण्यातील जलप्रदुषणाकडे महापालिका आणि राज्य सरकारचे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकारामुळे पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा संगमवाडीत संगम होतो. शहरातील मैलामिश्रीत पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने नदी प्रदूषीत झालेली आहे. मैलमिश्रीत पाणी नदीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी महापालिकतर्फे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. शहरात दिवसाला किमान ९०० एमएलडी सांडपाणी तयार होत आहे, त्यापैकी प्रतिदिन केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. पण तरीही ४५० एमएलडी घाण पाणी थेट नदीत येत आहे. मुठा नदीमध्ये फक्त सांडपणी येत आहे. तर मुळा नदीमध्ये पिंपरी-चिंचवड भागातील कंपन्यांमधून सोडले जाणारे रसायनमिश्रीत केलेले विषारी पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये येऊन मिसळत आहे. त्यामुळे या नद्यांमधील पाणी सजिवांसाठी धोकादायक आहे.
पुण्यात नदीकाळ सुधार प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. नदीचा काठ सुधारला म्हणजे पुण्याच्या सौंदर्यात मोठी भर पडेल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र दुसरीकडे नदीतील पाणी प्रदुषण दिवसेंदिवस वाढत त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया (एसटीपी) करणारे प्रकल्प मोठ्या क्षमतेने सुरु आहेत. मात्र त्यानंतरही जलप्रदुषणामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
दरम्यान, मुळामुठा नदीमध्ये संगमवाडीच्या जवळ नाईक बेटाजवळ नदीमध्ये मृत माशांचा खच पडलेला आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीही या भागात सुटली आहे. याठिकाणी महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पदेखील आहे. महापालिका प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर तेथील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचा अहवाल पुढील दोन ते तीन दिवसात प्राप्त झाल्यानंतर माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.
मुळामुठा नदीमध्ये माशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण समोर येईल. नायडू सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया न केलेले पाणी बाहेर आले आहे का याची तपासणी केली असता तसे काही आढळून आलेले नाही. मलनिःसारण विभागाला सांडपाणी वाहिनी फुटली आहे का हे व्यवस्थित तपासणी करण्यास सांगितले. माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे समोर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.