संग्रहित छायाचित्र
पुणे (25 डिसेंबर) : पोतराज, नंदीबैल, आदिवासी नृत्य, शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भारुडवाले, मल्लखांब प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या 18व्या भीमथडी जत्रेत आज पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली. अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीमथडी जत्रेचा काल समारोप झाला. महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यासह इतर 12 राज्यातील 338 बचत गटातील महिलांनी बनविलेल्या उत्पादनांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामीण उत्पादने, हस्तकला, व गावाकडील चवीचे पदार्थ या सर्वांना शहरी भागात बाजार पेठ मिळावी, दुवा साधला जावा यासाठीच भीमथडी काम करते. अनके पुणेकरांनी आवडलेल्या वस्तू तर खरेदी केल्याच पण पुढे भविष्यात आणखी काही मागणी द्यायची असेल तर बचत गटांचे संपर्क नं घेतले आहेत- आणि हेच भीमथडीचे यश आहे.
चालू वर्षीच्या भीमथडी जत्रेला जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिली व सामाजिक बांधिलकी जपत जवळपास 7 कोटी 63 लाख रुची खरेदी करून बचत गटातील महिलांना समर्थन केले. या अर्थाने भीमथडीने सर्वच स्टॉल धारकांना नफा मिळवून दिला असल्याने स्टॉल धारक परतत असताना त्यांच्या चेह-यावर आत्मविश्वास व समाधान पाहायला मिळाले असे आयोजक सुनंदा पवार यांनी सांगितले. या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुणेकरांनी सर्वच दालनात फिरून माहिती घेतली, खरेदी केली आणि भीमथडी जत्रा म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी एक चांगले व्यासपीठ असल्याचा अभिप्राय दिला. शाकाहारी व मांसाहारी विभागात मोकळ्या जागेत बसकण मांडून ग्राहकांनी भारतीय बैठकीत जेवणाचा आस्वाद घेतला.
भिमथडी जत्रा यशस्वी करण्यामध्ये हजारो हात राबत असतात. यातील काही विभागात काम करणाऱ्या प्रातिनिधिक स्टाफचा सत्कार सोहळा काल आयोजित केला होता. या मध्ये आतील हाऊस किपिंग, बाहेरील स्वच्छता, मंडपवाले, वॉशरूम विभाग, पार्किंग विभाग, पाणी सप्लायर्स, सुरक्षा विभाग, फोटोग्राफी इत्यादी विभागात काम कारणा-यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला आणि 18 डिसेंम्बर 2025 ते 21 डिसेंम्बर 2025 या पुढील वर्षीच्या तारखा जाहीर करून भीमथडीचा समारोप झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.