संग्रहित छायाचित्र
एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा आनंद साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे विद्येचे माहेरघर अर्थात पुण्यातील 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी बिरूदावली मिरविणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची सुसज्ज इमारत आणि ग्रंथसाठा बेवारस पद्धतीने पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेकडून याबाबत आंदोलन करण्यात आले. या विषयावर ‘सीविक मिरर’सोबत बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय भोसले म्हणाले,‘‘यंदा महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवनाचे लोकार्पण करण्यात आले. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत मराठी भाषा भवनाचा एकाही विद्यार्थ्याला उपयोग झालेला नाही. आतील सर्व पुस्तके दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सदर वास्तूला गळती लागल्याचे दिसून येते. निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे, लाईट नाही, पाणी नाही, बाथरूम नाही. बसायला खुर्च्या, टेबल नाही.’’ उद्घाटनावर लाखो रुपये खर्च करूनही मराठी भाषा भवन वापरात येणार नव्हते तर याचे लोकार्पण का करण्यात आले, असा सवालदेखील भोसले यांनी उपस्थित केला.
मराठी भाषा भवनच्या चारही बाजूने पत्र्याचं कंपाउंड करून बंद ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भिंतींचे प्लास्टर उखडले आहे. पुस्तकांवर धुळीचे साम्राज्य आहे. विद्यार्थ्यांना बसायला काहीही व्यवस्था नाही. विद्यार्थी येऊन याचा लाभ घेतात असं सांगितलं जातं, परंतु असे काहीही आढळून येत नाही. पुणे विद्यापीठाचे साडेसहाशे कोटीचे बजेट असून या बजेटचा अपव्यय होताना दिसत आहे. मुख्य इमारत ही हेरिटेज वास्तूमध्ये गणली जाते. तरीही इमारतीला बेकायदेशीररित्या होल मारून लाईट्स लावण्यात आले. त्याचा खर्च तब्बल अडीच कोटी रुपये दाखवण्यात आला. तसेच विद्यापीठामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु तशी केबल कुठेही टाकल्याचे किंवा राउटर बसविल्याचे दिसून येत नाही, असा आरोप भोसले यांनी केला.
म्हणे, मराठी भवनाची किरकोळ कामे बाकी आहेत...
नाव न छापण्याच्या अटीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. मराठी भवनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे. निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी आणि अन्य तांत्रिक बाबींच्या पूर्ततेला वेळ गेला. परंतु मराठीभवनाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत आणि बाह्य अशी किरकोळ कामे बाकी आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
या संदर्भात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.