संग्रहित छायाचित्र
वानवडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील जयसिंगराव गणपत ससाणे उद्यान आणि परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या उद्यानातील भटकी कुत्री उचण्यासाठी महापालिकेची गाडी आली असता उद्यानाचा भाग हा आमच्या हद्दीत येत नाही तसेच या कुत्र्यांची नसबंदी केली असून त्यांचे लसीकरण केले आहे, असे सांगून कुत्रे उचण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून रस्त्याने जावे लागत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. रात्रीच्या वेळी एकाच वेळीत १० ते १५ कुत्र्यांची झुंड दुचाकीच्या मागे लागल्याने चालकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. असे असताना पुणे महापालिकेच्या उद्यानांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
बी. टी. कवडे रस्त्यावर ससाणे उद्यान आहे. या उद्यानात भटक्या कुत्र्यांची उपद्रव वाढला आहे. हे कुत्रे उद्यानात फिरत असतात. अचानक भुंकत उद्यानात आलेल्या व्यक्तींच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचे महापालिकेकडून लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी हल्ला केला तर फारसा फरक पडत नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय आणि हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीच्या बॉर्डरवर हे उद्यान आहे. त्यामुळे या उद्यानातील भटकी कुत्री कोणी पकडून न्यायची, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यानातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने हद्दीचा विचार न करता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, कात्रज येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या ११ महिन्यांत २३ हजार ३७४ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर आल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेकडून विविध भागात उद्याने बांधण्यात आली आहेत. प्रकृती स्वास्थासाठी नागरिक बागेत फिरण्यासाठी येत असतात. त्याच प्रमाणे बी. टी. कवडे रस्त्यावरील जयसिंगराव गणपत ससाणे उद्यानात आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या संख्येने या उद्यानात फिरण्यासाठी येतात. खेळण्याचे साहित्य उद्यानात असल्याने मुलेही आई-वडील, आजी-आजोबांसोबत येतात. त्याचवेळी येथील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव त्यांना सहन करावा लागतो. कुत्रे भुंकत थेट अंगावर येण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या उद्याच्या बाजूने कंपाऊंड बांधण्यात आले आहे. त्यावर जाळ्या बसविण्यात आल्यात आहे, उद्यानाच्या एका कोपऱ्यातील जाळी खराब झाली असून तुटली आहे. या तुटलेल्या जाळीतून भटकी कुत्री उद्यानात शिरत आहेत. एकाच वेळी दहा ते पंधरा कुत्र्यांची झुंड येत असल्याने उद्यानात असलेल्या व्यक्तींचा जीव धोक्यात येत आहे. या कुत्र्यांचा उपद्रव होऊ नये, भविष्यात मोठी घटना घडू नये, यासाठी उद्यानात येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेच्या उद्यान विभागाने करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परंतु उद्यान विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही
दरम्यान, या उद्यानातील सुरक्षारक्षकांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. उद्यानात आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, या उद्यानात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. परंतु केवळ कारवाई केली जाईल, असे सांगितले जाते. परंतु दुसऱ्या दिवसी भटके कुत्रे या ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे महापालिकाच भटके कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून आहे.
महापालिकेकडून उपचाराच्या खर्चास मंजुरी
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून हले केले जाऊ लागले आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याचा उपचाराचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. भटके कुत्रे चावल्यानंतर उपचार कसा करावा, असा गंभीर प्रश्न त्या व्यक्तीपुढे निर्माण होतो. याची दखल घेत महापालिकेकडून आता अशा नागरिकांना मदत केली जाणार असून त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिकेकडून केला जाणार आहे. तसेच इतर नैसर्गिक दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी महापालिका मदत करणार आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीपुढे सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. त्यानुसार वित्तीय समितीने सुमारे आठ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.
या निधीतून उपचारासह इतर कामे केली जाणार आहे. याच खर्चातून डॉग पार्कचाही खर्च केला जाणार आहे. भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांचे लसीकरण केले जाते. त्यानंतर पुन्हा त्याच भागात कुत्र्यांना सोडले जाते. परंतु लसीकरणाचा प्रश्न सुटत नाही. नागरिकांना होणारा त्रास तसाच सुरु राहतो. त्यामुळे आता महापालिकेने अॅमेनिटी स्पेसमध्ये कंपाऊंड तयार केले जाणार असून त्यामध्ये या भटक्या कुत्रांना सोडण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.