रोहित्रांच्या सुरक्षा कवच, महावितरणकडून फायबर प्लस्टिकचे संरक्षक कुंपण
महावितरणकडून पुणे परिमंडलामध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांच्या व डबल पोल स्ट्रक्चरच्या ठिकाणी वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येत आहे. पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत या फायबर प्लॅस्टिकचे कुंपण अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
रास्तापेठ विभाग अंतर्गत लुल्लानगर येथे बसविण्यात आलेल्या फायबर प्लॅस्टिक कुंपणाची मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र भुजबळ उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, हवेली, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या २५० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचे जाळीदार कुंपण लावण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये सार्वजनिक गर्दीच्या, रस्त्याबाजूला, दाट वस्तीच्या, बाजारपेठांमध्ये आदी ठिकाणी वितरण रोहित्र आणि डबल पोल स्ट्रक्चर आहेत. या सार्वजनिक ठिकाणी वीजसुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी जाळ्यांचे संरक्षक कुंपण लावण्यात आले आहे. तथापि पावसामुळे लोखंडी कुंपण गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरीद्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत. त्यामुळे लोखंडी कुंपणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणकडून सातत्याने उपाययोजना करावी लागत आहे.
वीजसुरक्षेसाठी आवश्यक संरक्षक कुंपणावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून आता लोखंडाऐवजी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचा पर्याय समोर आला आहे. फायबर प्लॅस्टिकच्या सुमारे सात-आठ फुट उंचीच्या जाळीदार संरक्षक कुंपणावर उनपावसाचा कोणताही परिणाम होत नाही. सडत नाही तसेच आगीने जळत नाही. मजबूत व टिकाऊ असल्याने तुटणे, खराब होणे सहजशक्य नाही. भंगारात या प्लॅस्टिकला काहीच किंमत नसल्याने चोरी होण्याचे प्रकार होणार नाही. पुणे परिमंडलामध्ये वीजसुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चरच्या २५० ठिकाणांची निवड करण्यात आली असून तेथे प्रायोगिक तत्त्वावर फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचे संरक्षक कुंपण लावण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.