Pune : समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ववत चालू ठेवा – सुप्रिया सुळे
पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र पाठवले असून तसे ट्विटही केले आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसनगर आदी गावांमध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच महापालिकेने एक पत्रक जारी करुन दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले आहे. नागरीकांना ही अस्वस्थ करणारी बाब आहे, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुणे महापालिकेत समाविष्ट धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसनगर अशा गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच महापालिकेने एक पत्रक जारी करुन दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले आहे.नागरीकांना ही अस्वस्थ करणारी बाब आहे. अगोदरच अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरीक हैराण…
— Supriya Sule (@supriya_sule) May 17, 2023
समाविष्ट गावांत अगोदरच नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरीक हैराण आहेत. त्यात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा नागरीकांना आणखी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील नागरीकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा पुर्ववत सुरु ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.