अभंग आणि भजन स्पर्धेने वाचवले, कारागृहातील कैद्यांना मिळणार विशेष माफी

अपर पोलीस महासंचालकांची कैद्यांना विशेष माफी देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये महाअंतिम फेरी करीता निवड झालेल्या कारागृह संघांतील बंद्यांना ९० दिवस माफी मिळणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 28 Jun 2023
  • 03:38 pm
yerwada jail : अभंग आणि भजन स्पर्धेने वाचवले, कारागृहातील कैद्यांना मिळणार विशेष माफी

अभंग आणि भजन स्पर्धेने वाचवले, कारागृहातील कैद्यांना मिळणार विशेष माफी

येरवडा कारागृहात महाराष्ट्रातील कैद्यांसाठी आयोजित करण्यात आली होती स्पर्धा

महाराष्ट्र कारागृह विभागाचे "सुधारणा व पुनर्वसन" या ब्रीद वाक्याचा उद्द्येश साध्य होण्याच्या दृष्टीने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाण, पुणे आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यांकरिता येरवडा जेलमध्ये राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या कैद्यांना कारागृह नियमावली नुसार विशेष माफी देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

येरवडा कारागृहातील आयोजित स्पर्धांमध्ये कैद्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जून रोजी घेण्यात आली होती. सर्व सहभागी संघांनी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात व तल्लीनतेने भजन व अभंग सादर केले. तसेच बंद्यांमधील अभंग व भजन सादर करताना विठ्ठलचरणी एकरूपता दिसून आली. सध्या राज्यभरातून सर्व ठिकाणांहून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत. अश्या भक्तिमय वातावरणात बंद्यांनी सादर केलेली कला अद्वितीय होती.

१३ जून रोजी महाअंतिम फेरी तर त्याचा कळस होता. त्याचप्रमाणे या स्पर्धेस विविध प्रसार माध्यमातूनही व्यापक प्रसिद्धी मिळाल्याने जनमानसात महाराष्ट्र कारागृह विभाग बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसना बाबत राबवत असलेले विविध उपक्रमा विषयी सकारात्मक दृष्टीकोन तयार होत आहे.

एकंदरीत स्पर्धा व महाअंतिम सोहळ्याचे निटनिटके आयोजन तसेच बंद्यांमधील उत्साह व शिस्त पाहता सदर स्पर्धेतील सर्व सहभागी बंद्यांना अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांना कारागृह नियमावली नुसार विशेष माफी देण्याचे प्राधिकार आहेत. त्यानुसार, अपर पोलीस महासंचालकांची कैद्यांना विशेष माफी देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये महाअंतिम फेरी करीता निवड झालेल्या कारागृह संघांतील बंद्यांना ९० दिवस माफी मिळणार आहे.

तसेच स्पर्धेत उल्लेखनीय प्रदर्शन करून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या कारागृह संघातील बंद्यांना ६० दिवस आणि इतर सहभागी संघातील बंद्यांना ३० दिवस माफी देण्यात येणार आहे. माफी मिळाल्यामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक मानसिकता तयार होईल. तसेच त्यांची कारागृहातून लवकर सुटका होऊन त्यांचे समाजात पुनर्वसन होण्यास मदत होईल, असे कारागृहातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest