Pune Ganeshotsav 2024: पर्यावरणाचा देखावा अन् पुस्तकांची आरास

पर्वती येथील रत्नाकर जोशी यांनी लोहगाव विमानतळाचा देखावा घरगुती गणपती समोर सादर केला आहे. वडगाव शेरी येथील रघुनाथ जगताप यांनी गणपती समोर विविध पानाफुलांच्या रोपांची आरास केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Mon, 16 Sep 2024
  • 01:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पर्वती येथील रत्नाकर जोशींनी सादर केला विमानतळाचा देखावा, वडगाव शेरीत पर्यावरणाच्या संदेशासाठी विविध रोपांची आरास!

पर्वती येथील रत्नाकर जोशी यांनी लोहगाव विमानतळाचा देखावा घरगुती गणपती समोर सादर केला आहे. वडगाव शेरी येथील रघुनाथ जगताप यांनी गणपती समोर विविध पानाफुलांच्या रोपांची आरास केली आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मधील निवृत्त कर्मचारी रत्नाकर जोशी यांनी पर्वती येथील घरात विमानतळाचा देखावा सादर केला आहे. यात विमानतळ टर्मिनल, रन वे, विमाने ठेवली आहे. हँगर, वाहनतळ देखाव्यात सादर केले आहे. वडगाव शेरी येथील रघुनाथ जगताप यांनी घरच्या गणपती समोर पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी विविध प्रकारची रोपे लावली आहेत. जगताप गेली वीस वर्षे घरगुती गणपतीजवळ रोपांची आरास करतात.

पर्वती येथील रत्नाकर जोशी यांची मोटारींची दुनिया निराळीच आहे. त्यांच्याकडे २२५ मोटारींच्या प्रतिकृती आहेत. यापैकी १७५ परदेशी बनावटीच्या तर ५० भारतीय बनावटीच्या आहेत. १९२३ सालच्या फोर्ड बनावटीचे ट्रकपासून ते सध्याच्या बीएमडब्ल्यूपर्यंतच्या प्रतिकृती आहेत. मर्सिडिस बेंझ , फोर्ड, हमर, कूपर, फेरारी, जॅग्वार ऑडी या परदेशी तर बनावटीच्या कार तर मारुती, हिंदुस्थान मोटर्स, महिंद्रा, टाटा कंपनीच्या भारतीय बनावटीच्या कार आहेत. त्याचबरोबर सुझुकी, होंडा, बजाज कंपनीच्या दुचाकींच्या प्रतिकृती आहेत.

जोशी यांनी घरात शहरातील वाहतूक कोंडी हा देखावा सादर केला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये त्यांनी वेगवेगळे रस्ते, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतुकीचे नियम देखाव्यात सादर केले होते. आता त्यांनी विमानतळाचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यात विमानतळ टर्मिनल, विमानाचे लॅंडिंग आणि टेक ॲाफ, विमाने पार्क केली जातात ते हॅंगर , विमानतळासमोरील रस्ता, रस्त्यावरील वाहने, विमानतळाजवळील इमारती आदी देखाव्यात दाखविण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी आबालवृद्धांची गर्दी होत आहे.

वडगाव शेरी येथील अरुणा निवास या ठिकाणी रघुनाथ जगताप यांचा बंगला आहे. सुमारे पाच हजार चौरस फुटामध्ये फुलझाडांची विविध प्रकार पाहायला मिळतात. जगताप यांच्या बागेत ८० टक्के झाडाच्या कांड्या आणून फुलझाडे आणि फळझाडे  तयार केली आहेत. दहा टक्के कलम केलेली तर काही बियांपासून उगवलेली रोपे फुलझाडे आणि फळझाडे आहेत. यामध्ये संत्रा, चिक्कू, आंबा ही फळे लक्ष वेधून घेतात.  नेपाळमध्ये पशुपतीनाथ येथील पंचमुखी रुद्राक्षाचे सर्वात उंच झाड असून वर्षातून दोनदा रुद्राक्ष येत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

जगताप यांच्या बंगल्यात दोन ते तीन गुंठ्यात विविध प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे जगताप दरवर्षी गणपतीच्या आरासमध्ये विविध प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे ठेवतात. शहरीकरणामुळे काॅंक्रिटच्या जंगलात जगताप यांनी फूल आणि फळझाडांचे नंदनवन फुलवले आहे. त्यांच्या बंगल्यातच नाही तर बाहेरसुद्धा विविध प्रकाराची झाडे आहेत. त्यामुळे हा परिसर हिरवागार दिसतो.

कर्वेनगर भागातील पुस्तकांची आरास चर्चेत
कर्वेनगर भागातील मोरया मित्र मंडळाने केलेली पुस्तकांची आरास परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. तसेच पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सवदेखील जगभरात प्रसिद्ध आहे. या शहरातील गणेश मंडळे कल्पक देखावे साकारून गणेशोत्सव साजरा करत असतात. असाच एक आगळावेगळा देखावा कर्वेनगर आणि कोथरूडमध्ये सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मोरया मित्र मंडळाने सादर केला आहे. ’बुद्धीच्या देवतेला विद्येची आरास’ या नावाने हा देखावा साकारला असून, किताबवाला आणि नागरिकांमार्फत पुस्तके जमा करून श्री गणेशाला पुस्तकांची आकर्षक आरास केली आहे. तसेच सर्व प्रकारची वर्तमानपत्रे लावण्यात आली आहेत. वाचनाबद्दल जनजागृती व्हावी, या  उद्देशाने घोषवाक्यांचे फ्लेक्सदेखील लावले आहेत.  

मोरया मित्र मंडळाचे संस्थापक केदार मारणे  यांच्या संकल्पनेतून हा देखावा सादर झाला. किताबवाला यांच्या सहकार्याने पुढच्या पिढीला ऐतिहासिक वारसा कळावा म्हणून ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीदेखील करण्यात येत आहे. त्यात सर्व पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली असल्याचे केदार मारणे यांनी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, कार्याध्यक्ष अक्षय केसवड, खजिनदार गणेश गायकवाड, उत्सव प्रमुख शुभम कदम, सिद्धार्थ शेलार यांनी यासाठी परिश्रम घेतले.

वाचनाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून हा देखावा मंडळाने साकार केला आहे. नवीन पिढीमध्ये मोबाइलचे वेड जास्त आहे. ती पिढी वाचनाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यासाठी गणेशोत्सव हे उत्तम माध्यम आहे, म्हणून हा उपक्रम राबवला आहे.
- केदार मारणे, संस्थापक,  मोरया मित्र मंडळ

बागकाम करताना मोठे मानसिक समाधान मिळते. निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा आनंद मिळतो. बागेतील झाडे बहरताना पाहिले की सारे दुःख विसरले जाते. ५० वर्षे या वृक्षांच्या सानिध्यात असल्यामुळे वयाच्या ८८ व्या वर्षी सुद्धा मधुमेह, रक्तदाब किंवा कोणताही आजार नाही. त्यामुळे गणरायासाठी पानाफुलांच्या रोपांची आरास केली आहे.
- रघुनाथ जगताप, वृक्षमित्र

महाराष्ट्रात कारच्या विविध २२५ माॅडेल्सचे चाळीस ठिकाणी प्रदर्शन भरविले आहे. त्यास हजारो विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.  अनेकांनी याच्याशी संबंधित आरास करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही यावर विचार करून विमानतळाची आरास करण्याचे ठरवले.
- रत्नाकर जोशी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest