पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा बंदोबस्त; सहा हजार पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार गर्दीच्या सागरावर नजर

पुण्याचे वैभव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सावाचे देखावे पाहण्यासाठी तसेच गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला आहे.

Ganesh visarjan

पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा बंदोबस्त; सहा हजार पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार गर्दीच्या सागरावर नजर

पुण्याचे वैभव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सावाचे देखावे पाहण्यासाठी तसेच गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला आहे. गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (दि. १७) होणार असून विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता सहा हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

याबरोबरच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीदेखील नजर राहणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विसर्जन मिरवणूक सोहळ्यात घातक लेझर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीच दिला आहे.

पुण्याच्या गणेशोत्सावात ज्याप्रमाणे देखावे पाहण्याची उत्सुकता भक्तांना असते तेवढीच उत्सुकता विसर्जन मिरवणुकीचीही असते. मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांची सकाळपासून गर्दी होत असते. त्यामुळे पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येतो. ढोल ताश्यांच्या गजरासह पारंपारिक वाद्यांचा मिरवणुकीत समावेश असतो. यासोबतच अनेक गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणूक सोहळ्यात घातक लेझर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर केला जातो. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लेझर दिव्यांच्या वापरामुळे डोळ्यांना इजा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत त्यावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. त्यावर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून गणेश मंडळांवर लक्ष ठेवले जाणार आहे. लेझर दिव्यांचा वापर न करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना आवाहन केले आहे. मात्र, विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांकडून यंदाही ध्वनिवर्धक यंत्रणा आणि लेझर दिव्यांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून खरंच कारवाई होणार का, याकडे लक्ष लागून आहे.

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक गर्दी करत असतात. विसर्जन मिरवणुकीसाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. 

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मंडळांना मागणी केल्यानंतर मंगळवारी रात्री बारापर्यंत साऊंड सिस्टीम वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणाच्याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

 -जी. श्रीधर, 

पोलीस उपायुक्त विशेष शाखा

शहराच्या मध्य भागातील १७ रस्ते राहणार बंद

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. असे असले तरी आपत्कालीन पररिस्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिका, अग्निशमनदलाच्या गाडीला मार्ग काढून देण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना वैद्यकीय मदत मिळण्यास कोणताही अडथळा येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest