पुण्याला रेड अलर्ट!

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी गंभीर स्थिती निर्माण झाल्याने पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने शहराला रेड अलर्ट दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 26 Jul 2024
  • 12:37 pm

संग्रहित छायाचित्र

शाळा-महाविद्यालये, कार्यालये, पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आदेश

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी गंभीर स्थिती निर्माण झाल्याने पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने शहराला रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने या भागातील शाळा २६ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

 हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार येत्या पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. सखल भागात पाणी साचून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. ‘एनडीआरएफ’कडून मदत, बचावकार्य सुरू आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाने सांगितले आहे. शहरातील परिस्थिती लक्षात घेता पुणे, पिंपरी चिंचवड भागातील शासकीय कार्यालये वगळता इतरांना कामकाज बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मध्य महाराष्ट्रासह घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या २४ तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

खडकवासलातून ४० ते ५० हजार क्यूसेक विसर्ग !

खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने ८ बोटी आणि बचाव पथके मदातकार्यासाठी नियुक्त केली आहेत. एनडीआरएफ, अग्निशमन विभागासह लष्कराच्या काही तुकड्या तैनात केल्या आहेत.

पर्यटनावर बंदी !

जिल्ह्यातील धरण, तलाव, धबधबे, पर्यटन स्थळे, धोकादायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ४०० नागरिकांना  स्थलांतरित करण्यात आले आहे. कोणत्याही गावाचा अद्याप संपर्क तुटलेला नाही. लोणावळा परिसरात काळजी घेण्यात येत आहे.

ताम्हिणी घाट रस्ता बंद !

जिल्ह्यातील मुळशी ताम्हिणी घाट येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. आदरवाडी (ता. मुळशी) गावच्या या ठिकाणी डोंगराचा कडा तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मी आहे . १० ते १२ फूट उंचीचा मातीचा स्तर रोडपर्यंत आला आहे. रस्त्यावरील दरड स्वच्छ करण्यासाठी किमान ५-६ तास तरी लागतील. त्यामुळे रस्ता बंद केला आहे. 

‘लवासा’ त ३ जण बेपत्ता !

मुळशी तालुक्यात असलेल्या लवासा सिटीमध्ये दरड कोसळली आहे. दरडीखाली ३ बंगले आले असून यामध्ये २ ते ४ नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळावरील फोटो, व्हीडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ४१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

‘वर्क फ्रॉम होम’ चे आवाहन

शासकीय कार्यालयांशिवाय इतर आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुट्टी द्यावी. आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम करण्यात यावे. सरकारी कार्यालये सुरू राहतील. खासगी कंपन्या, आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

खंडित घाटरस्ते, महामार्ग !

 मावळ-सोमाटणे-दारुंब्रे-कासारसाई

 ताम्हिणी घाट

 वडगाव मावळ-कामशेत

 वेल्हे-खडकवासला

 उरण-पनवेल-खोपोली

पुलाच्या वाडीत वि‍जेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू 
डेक्कन जिमखाना भागातील पुलाची वाडी येथे मध्यरात्री विजेचा धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. अभिषेक अजय घाणेकर (वय २५), आकाश विनायक माने (वय २१, दोघेही रा. पुलाची वाडी डेक्कन) आणि नेपाळी कामगार शिवा जिदबहादूर परिहार (वय १८) अशी  मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे तीन कामगार गाडी बंद करून आवराआवरी करत होते. त्यानंतर ते घरी निघाले असता पुलाची वाडी भागात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिघांना विजेचा धक्का बसला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे तिघांचा मृत्यू झाला.  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest