पुण्याला २१ टीएमसी पाणी द्या; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुणे शहर मोठ्या प्रमाणात विस्तारले असून अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. या समस्येतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी २१ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करावा, अशी मागणी काॅंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.

Pune, Pune News, Pune Water Issue, Ravindra Dhangekar, Pune Water News

संग्रहित छायाचित्र

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडली पाणीटंचाईवरून लक्षवेधी

पुणे शहर मोठ्या प्रमाणात विस्तारले असून अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. या समस्येतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी २१ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करावा, अशी मागणी काॅंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे २०.९० टीएमसी पाण्याची मागणी केली होती. परंतु, पुणे महापालिकेच्या मागणीकडे राज्य सरकारने लक्ष दिले नाही. महापालिकेत समाविष्ट गावांना अतिरिक्त पाणी देणे आवश्यक होते. परंतु, शासनाने महापालिकेला पुरेसा पाणीसाठा करण्याची मागणी करूनही वाढ केली नाही. याचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. या समस्येतून सुटका करण्यासाठी पुण्यासाठी २१ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी  पावसाळी अधिवेशनात केली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एक टीएमसी कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. घाट भागात अजूनही तुलनेने पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणेकरांवर पाणी संकटाची टांगती तलवार आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात पाणीसंकटाचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

धंगेकर म्हणाले, ‘‘पुण्याच्या पाणीप्रश्नावर आम्ही सातत्याने शासन आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत आहोत. गेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. पाऊस सुरू असूनही पुण्यातील अनेक भागात पाणी येत नाही. लाखो नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्याचबरोबर काही भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.’’ हे चित्र बदलून पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्नदेखील धंगेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

महापालिकेत समाविष्ट असलेल्या ३४ गावांसह पुणे शहरात पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्याचवेळी समान पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहे. त्यामुळे शासनाने समान पाणीपुरवठा योजना आणि शुद्ध पाणीपुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. टँकर माफियांवर अंकुश ठेवण्याचीही मागणी धंगेकर यांनी केली.

कात्रज तलावातील अर्धा टीएमसी पाण्यासाठी कार्यवाही करणार : फडणवीस

पुणे शहराच्या पाण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘जास्त पाणी वापरल्यास कायद्यानुसार दंड आकारला जातो. मात्र, त्याची वसुली अद्याप झालेली नाही. पुणे शहराची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी घेण्याबाबत लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.’’ तसेच कात्रज भिलारेवाडीत ०.५ टीएमसी पाणी उपलब्ध असल्यास महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने सर्वेक्षण करून ते मिळविण्यासाठी कार्यवाही करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

पुण्याच्या पाण्यासाठी काँग्रेस-भाजप आमदार एकत्र

विधानसभेत पुण्याच्या पाणीप्रश्नादरम्यान काँग्रेस आणि भाजप आमदार एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. या चर्चेदरम्यान भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनीही पुणे शहराला भेडसावत असलेल्या पाणीटंचाईकडे सरकारचे लक्ष वेधले. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमुळे आणि शिक्षण आणि आयटीमुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला २० टीएमसीपेक्षा जास्त पाण्याची गरज आहे. त्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest