पुणे: मिळकतकर थकबाकीमुळे पाणीपुरवठा केला थेट बंद; महापालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

मिळकतकराची थकबाकी भरावी यासाठी मिळकतदाराच्या दारात बँड वाजविला जातो. मिळकती जप्त केल्या जातात. आता भर उन्हाळ्यात थकबाकी वुसलीसाठी नळजोड तोडल्याचा धक्कादायक प्रकार मिळकतकर विभागाने केल्याने नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

मिळकतकर थकबाकीमुळे पाणीपुरवठा केला थेट बंद

बड्यांना अभय अन् सवलती देताना सामान्यांच्या बाबतीत नियमाकडे बोट

मिळकतकराची थकबाकी भरावी यासाठी मिळकतदाराच्या दारात बँड वाजविला जातो. मिळकती जप्त केल्या जातात. आता भर उन्हाळ्यात थकबाकी वुसलीसाठी नळजोड तोडल्याचा धक्कादायक प्रकार मिळकतकर विभागाने केल्याने नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

पालिकेच्या मिळकतकर विभागाने यंदा ठरलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. थेट मिळकती जप्त करून त्याचा लिलाव करून थकबाकी वसुली केली. दुसरीकडे बड्या राजकीय व्यक्तींना नोटीस देऊन पुन्हा माघार घेत करामध्ये सवलत दिल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यातच सर्वसामान्य मिळकतदारांचे आणि गुरुवार पेठेतील एका सामाजिक संस्थेचा नळजोड तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण संस्था, शासकीय संस्था, कार्यालये, व्यावसायिक इमारती यांच्या मिळकतीसह बड्या राजकीय व्यक्तीने त्यांच्या मिळकतींचा कोट्यवधी रुपयांचा कर थकविला आहे. मात्र त्यावर कारवाई करताना मिळकतकर विभाग मागे-पुढे पाहते. गरिबांच्या तसेच सामाजिक संस्थांचा कर काही कारणामुळे थकला आहे. त्यावर पालिकेने म्हणणे ऐकून घेणे क्रमप्राप्त होते. मात्र त्याऐवजी एक नोटीस देऊन थेट नळजोड तोडला गेला आहे. सध्या शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. शहरासह उपनगर भागात पाण्याचा असमान पाणीपुरवठा होत आहे. पाणी बंद केल्याने आता इमारतीमध्ये स्वच्छतागृहात, कार्यालयांमध्ये पाणी नाही. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तसेच शेजारच्यांना पाण्यासाठी विनवणी करण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी एक ते दीड हजार रुपये मोजून टॅंकर विकत घ्यावा लागत असल्याची माहिती येथील नागरिकांनी ‘सीविक मिरर’ ला दिली. याबाबत मिळकतकर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तसेच ते सुट्टीवर असल्याने त्यांच्याशी बोलता येणार नाही, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

२,२६७ कोटींची वसुली
महापालिकेला प्रामुख्याने बांधकाम विकास विभाग, मिळकतकर विभाग, जीएसटी संकलनातून उत्पन्न मिळते. त्यामुळे या विभागाकडून थकबाकी वसुली करण्यासाठी मोहीम राबविली जाते. २०२३-२४ आर्थिक वर्ष संपताना थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ देऊन वसुली मोहीम जोरदार राबविली होती. त्यातून एकूण २२६७ कोटी ९ लाख रुपयांचे कर संकलन झाले आहे.

थकबाकी १० हजार कोटी
महापालिका वसुली मोहीम राबवत असली तरी सध्याची थकबाकी १० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असल्याने पालिकेला कडक धोरण राबवावे लागत आहे. मात्र असे करताना मोठी रक्कम भरणे सहजशक्य होत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सवलत देऊन मिळकतकराची थकबाकी भरण्याची परवानगी द्यावी, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. मिळकतदाराने कर भरला नाही तर त्यावर दरमहा दोन टक्के व्याज आकारले जात आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाऊन संबंधित मिळकतधारकास मोठा भुर्दंड सहन करावा लागतो.  एकीकडे दंड लावला जात असताना दुसरीकडे जुलुमशाही पध्दतीने थेट नळजोड तोडला जात असल्याने मिळकतदारांनी महापालिकेच्या मिळकत विभागावर संताप व्यक्त केला आहे.

पाणीपुरवठा विभागाचे हात वर
मिळकतकर थकला म्हणून नळ तोडल्याची कारवाई केली जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला कोणत्या अधिकाऱ्याने सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार का केला जात आहे. अशी विचारणा पाणीपुरवठा विभागाला केली असता, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून पाणीपुरवठा विभागाने थेट हात वर केले आहेत. त्यामुळे मिळकतकर विभागाने परस्परच नळजोड तोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच नळजोड तोडताना मिळकतकर विभाग प्रमुखांनी आदेश दिले आहेत, असे सांगितले जात आहे.

बॉम्बे डायोसिस ट्रस्ट असोसिएशनचे वसतिगृह गुरुवार पेठेत जात होते. मात्र ट्रस्टने हे वसतिगृह गेल्या दोन वर्षांपासून बंद केले आहे. आता या ठिकाणी अल्प दरात व्यायाम शाळा चालविली जाते. ट्रस्टकडून सामाजिक कामे केली जातात. काही कारणांमुळे सुमारे सात लाख रुपयांचा मिळकतकर थकला आहे. महापालिकेने नोटीस देत थेट नळजोड तोडून पाणी बंद केले आहे. त्यामुळे येथे आमचे हाल होत आहेत. पाणी येत नसल्याने व्यायामशाळेतील तरुणांची संख्या कमी झाली आहे. महापालिकेने सामाजिक ट्रस्टचा विचार करून पाणीपुरवठा सुरू करावा. अशी विनंती गेल्या महिनाभरापासून केली जात आहे. परंतु नळजोड दिला जात नाही.- जॉनी जाधव, केअर टेकर- बॉम्बे डायोसिस ट्रस्ट असोसिएशनचे वसतिगृह

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून बड्या राजकारण्यांना अभय दिले जाते. मात्र दुसरीकडे गरिबांना सवलत आणि मुदत देताना नियमाकडे बोट दाखवले जाते. शहरात थकबाकी १० हजार कोटीच्या घरात आहे. अनेकांची कोट्यवधी रुपये थकबाकी आहे. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यास टाळाटाळ केली जाते. महापालिकेचा तुघलकी कारभार असून सामान्य नागरिकांचे पाणी बंद केले जात आहे.  

- ऋषिकेश बालगुडे, सामाजिक कार्यकर्ते

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest