‘पावसाने नव्हे चुकीच्या कामामुळे तुंबले पुणे’ - पालिका, मेट्रो, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, एमएनजीएलच्या विविध कामांमुळे शहर गेले पाण्याखाली

शहरात शनिवारी पावसाने कहर केला. वडगावशेरी, लोहगाव, कात्रजमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शहरातील रस्त्यांना नदी, नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले. पाऊस जास्त झाल्याने पुणे तुंबल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी पाणी तुंबण्याचे खरे कारण समोर आले आहे.

‘पावसाने नव्हे चुकीच्या कामामुळे तुंबले पुणे’

शहरात शनिवारी पावसाने कहर केला. वडगावशेरी, लोहगाव, कात्रजमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शहरातील रस्त्यांना नदी, नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले. पाऊस जास्त झाल्याने पुणे तुंबल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी पाणी तुंबण्याचे खरे कारण समोर आले आहे. शहरात पावसाळी लाईनमध्ये पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आडवी येणे, एमएनजीएलची गॅस पाईप लाईन मध्ये येणे, तसेच ऑप्टिकल फायबर केबल्स डकमधून नव्हे तर पावसाळी लाईनमधून टाकल्याने पुण्याची वाट लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडून पुणे पाण्याखाली गेल्याची स्थिती निर्माण झाली.

पालिकेने पावसाळी लाईन आणि नाले सफाईची कामे १५ मे पर्यंत पूर्ण केली होती. तसेच केलेल्या प्रत्येक कामाचे फोटोदेखील पालिकेच्या रेकॉर्डला आहेत. परंतु पावसाळी कामे करताना जोड म्हणून इतर विभागांनीही काळजी घेणे आवश्यक होते. त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शहरात पालिकेच्या कामांसोबत मेट्रो, सार्वजनिक बांधकाम  विभाग (पीडब्ल्यूडी), पीएमआरडीए, एमएनजीएल, तसेच अन्य केबल्स टाकण्याची कामे केली जात आहेत. तसेच पालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि पथविभागाकडून रस्त्याची कामे केली जात आहेत. या विविध विभागांकडून कामे केली जात असताना पावसाळी लाईनला अडथळा होईल अशी कामे केली जात आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल, याचा कोणताही विचार केला नव्हता. त्यामुळेच पाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे गार्डन समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तसेच सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग, पाटील बाग या ठिकाणीही याच कारणामुळे पाणी साचल्याचा दावा केला आहे. शहरात सुरु असलेल्या अन्य कामांमुळे शहराच्या पावसाळी लाईनकडे दुर्लक्ष केले असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्यासमोर ड्रेनेज विभाग, पथ विभाग, पाणी पुरवठा विभागासह इतर विभाग प्रमुखांची बैठक झाली होती. त्यावेळी ड्रेनेज विभागाने पावसाळी कामे केल्याची माहिती फोटोसह सादर केली होती. तसेच ज्या ठिकाणी कल्वर्ट आहेत, त्याठिकाणी काय उपाय योजना केल्या, याचीही माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ही कामे झाली असली तरी पथ, पाणीपुरवठा विभाग, मेट्रो, पीएमआरडीए यांच्याकडून होत असलेल्या कामांमुळे शहरातील पावसाळी लाईनला अडथळा निर्माण होईल, अशी माहितीही देण्यात आली होती. त्यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभागांना काळजी घेण्याचे तसेच कामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु कामे झालीच नसल्याने आता पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ला दिली.

लोखंडी जाळ्या काढल्याने साचते पाणी
पावसाळी लाईनच्या चेंबरवर असलेल्या लोखंडी जाळ्या चोरी गेल्याने त्याऐवजी सिमेंट जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी झाली आहे. लोखंडी जाळ्यांतील दोन बारमधे असलेले अंतर आणि सिमेंट झाकणामधील होलमधे असलेले अंतर यामुळे पाणी जेवढ्या प्रमाणात जाणे अपेक्षित आहे तेवढ्या प्रमाणात जात नाही. परिणामी पाणी तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचून राहते.
 
मेट्रोच्या चुकीच्या जाळ्या
मेट्रोचे काम झाल्यानंतर रस्त्यावर पावसाळी लाईनवर जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. या जाळ्या बसविताना केवळ त्यावरुन वाहन जाण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. मात्र पाणी वाहून जाण्यासाठीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, असा आरोप पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तसेच याबाबतची माहिती पोलीस विभागालाही दिली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नाल्यावर बांधकामे
समाविष्ठ २३ गावांसह वाघोलीत नाल्यावर बांधकामे सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पीएमआरडीएच्या निर्देशनास आणुन दिली आहेत. मात्र बांधकामांना परवानगी पीएमआरडीएकडून दिली जाते. मात्र ही परवानगी देताना बांधकामे नाल्यावर केले जात आहे की ओढ्यावर केले जात आहे याचा विचार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही पीएमआरडीएने परवाना देण्याचे आमचे काम आहे. पण पाण्याची जबाबदारी आमची नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे भविष्यात वाघोलीत पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण झाला आहे.  तसेच समाविष्ठ २३ गावांमध्ये नाले, ओढ्यावर बांधकामे केली जात आहे. यामुळे नाल्याचे पात्र अरुंद होऊ लागले आहे. याची वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. अशी भीतीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना व्यक्त केली.

‘पाऊस झाला मोठा, नालेसफाई घोटाळा खोटा’
एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटी पुणेची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे. पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास झटक्यात पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायच्या भानगडीत पडू नका, कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा... काळजी घ्या. अशा शब्दात आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली.

पालिकेची माहिती
 ७० ते ७५ ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम
 कलवड भागात पाणी साठण्याची कामे पूर्ण होत आहेत.
 पाणी साचणाऱ्या १२३  ठिकाणी उपाययोजना
 ११६ धोकादायक ठिकाणी काळजी

अग्निशमन दलाची माहिती
 शनिवारच्या पावसामुळे अप्पर ओटा येथे झाड पडून एकाचा मृत्यू 
 अग्निशमन दलाकडे झाडपडीच्या ५५ घटनांची नोंद
 पाणी साचले, शिरल्याच्या २२ तक्रारी
 भिंत पडल्याची १ घटना
 एकुण ७९ तक्रारी आल्या.
 अग्निशमन दलानेमध्यरात्री लोहगाव, कलवड वस्तीतून पाण्यात अडकलेल्या ३ व्यक्तींची केली सुटका 
 अग्निशमन दल अजून सेवेत

शहरात विविध ठिकाणी साचलेले पाणी काढून टाकण्याचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. पालिकेतील पथ विभाग, मेट्रो, पीएमआरडीए आणि इतर विभागांशी समन्वय ठेवून काम केले जात आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १० ते १५  कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धानोरी, सिंहगड रस्ता, वडगाव पुल, कलवड वस्ती, नगर रस्ता येथे पाणी साचणारी ठिकाणी स्वच्छ करण्यात आली आहेत.
- दिनकर गोंजारे, अधीक्षक अभियंता, देखभाल दुरुस्ती विभाग.

Share this story

Latest