PMC News: पथ विभागाने जंगली महाराज मंदिरासमोरील स्पीडब्रेकर खोदून काढला; बुजविण्यास मिळाले नाही डांबर!

जंगली महाराज रस्त्यावरील महाराजांच्या मंदिरासमोरील स्पीडब्रेकर महापालिकेच्या पथ विभागाने खोदून काढला आहे. त्यामुळे या ठिकाणी खड्डा तयार झाला आहे. तसेच खडी, वाळू रस्त्यावर पसरली आहे.

Pune Speed Breaker News

पथ विभागाने जंगली महाराज मंदिरासमोरील स्पीडब्रेकर खोदून काढला; बुजविण्यास मिळाले नाही डांबर!

जंगली महाराज रस्त्यावरील महाराजांच्या मंदिरासमोरील स्पीडब्रेकर महापालिकेच्या पथ विभागाने खोदून काढला आहे. त्यामुळे या ठिकाणी खड्डा तयार झाला आहे. तसेच खडी, वाळू रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी दुचाकीचालक घसरून पडून अपघात झाले आहेत. पथ विभागाच्या बोगस कामावर वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे शहरातील स्पीडब्रेकरबाबत ‘असून धोका, नसून जीवघेणे’ अशी स्थिती असल्याचे समोर आले आहे.

जंगली महाराज मंदिरासमोरील स्पीडब्रेकर काढण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला. त्यानुसार गुरुवारी (दि. १३) स्पीडब्रेकर काढण्यात आला. तो काढल्यामुळे रस्त्यावरील उंचवटा कमी झाला. पण त्यानंतर खड्डा तयार झाला. हा खड्डा पथ विभागाने तत्काळ बुजवणे आवश्यक असताना तो तसाच ठेवण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना कोणताही अंदाज येत नसल्याने या खड्ड्यात वाहने आदळत आहेत. तसेच चारचाकी वाहने घासली जात आहेत. खड्डा बुजविण्यास डांबर मिळाले नसल्याने खड्डा तसाच असल्याचे अजब कारण पथ विभागाकडून सांगण्यात आले.

समोर खड्डा दिसत नसल्याने वाहनचालक जोरात ब्रेक दाबतात. खड्ड्यात खडी आणि वाळू असल्याने अनेक दुचाकी घसरून पडल्याने अपघात झाले आहेत. शुक्रवारी (दि. १२) आणि शनिवारी (दि. १३) रात्री १२ च्या सुमारास तीन ते चार दुचाकी घसरून पडल्याने अपघात झाला. रस्त्यावर पायी फिरणाऱ्या नागरिकांनी त्यांना तत्काळ बाजूला घेतले. या अपघातात दुचाकीचालकांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे.

या स्पीडब्रेकरपूर्वी एक सिग्नल आहे. सिग्नल सुटला की वाहने वेगाने येतात. आता स्पीडब्रेकरच नसल्यामुळे वाहनांना चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. स्पीड ब्रेकरकाढल्यामुळे खड्डा तयार झाला असून वाहने सावकाश चालवा, असा संदेश देत, वाहनचालकांचे अपघात रोखण्यासाठी शनिवारी रात्री धनप्पा तानवडे, प्रमोद पाटील, ओमकार जगदाळे, सुनील गाढवे या तरुणांनी परिश्रम घेतले.  

शहरातील विविध भागातील सुमारे ३८५ रस्त्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या पथ विभागाने केले होते. या सर्वेक्षणामध्ये एकूण ६२७ स्पीडब्रेकर असल्याची माहिती समोर आली होती. या ६२७ स्पीडब्रेकरपैकी एक तृतियांश म्हणजे २०९ स्पीड ब्रेकर मानकांप्रमाणे असल्याची माहिती देण्यात आली होती. तर सविस्तर माहिती अहवाल प्राप्त झाल्यानंतर समोर येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र आता मानकांप्रमाणे किती स्पीडब्रेकर आहेत, किती स्पीडब्रेकरची आवश्यकता आहे, याचा अहवालच अद्याप पथ विभागाने तयार केला नाही. यावरून महापालिकेचा पथ विभाग रस्त्याच्या कामाबाबत तसेच दर्जाबाबत किती जागृत आहे, हे दिसून येते. तसेच स्पीडब्रेकरमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असे असतानादेखील पथविभाग याबाबत उदासीन असल्याचार आरोप आता पुणेकर करू लागले आहेत

शहरातील रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरमुळे वाहनाचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नियमानुसार स्पीड ब्रेकरवर कोणतीही रंगरंगोटी केली जात नाही, तसेच स्पीड ब्रेकर असल्याच्या सूचना दिल्याचे कुठे दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांचे अपघात होतात. तर दुसरीकडे स्पीड ब्रेकर नसूनही वाहनचालकांना अपघातांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या पथ विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून जाणून बुजून व्यक्तीचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करणे, या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा.
- धनप्पा तानवडे, सजग युवक

एखादा वाहनचालक जर रोज एकाच रस्त्याने जात असेल तर त्याला रस्त्यावर कुठे खड्डा अथवा स्पीड ब्रेकर आहे, याची माहिती असते. त्यामुळे तो त्याप्रमाणे वाहन चालवत असतो. मात्र नवीन वाहनचालकाला माहिती नसल्यामुळे तो नेहमीप्रमाणे वाहन चालवतो. अशा वेळी रस्त्यात अचानक खड्डा आला तर तो चुकविण्यासाठी ब्रेक दाबतो. त्यामुळे अपघात होतो. असाच प्रकार स्पीडब्रेकर काढल्यामुळे जंगली महाराज रस्त्यावर होत आहे. महापालिकेच्या पथ विभागाने स्पीडब्रेकर काढला आहे. पुढे खड्डा आहे, अशी सूचना लावलेली नाही. यावरून पथ विभागाचा निष्काळजीपणा दिसून येतो. यामध्ये कोणाचा अपघात झाला तर याला पथ विभाग जबाबदार धरावे.
- सुनील गाढवे, सजग युवक

जंगली महाराज मंदिरासमोरील स्पीडब्रेकर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तो काढण्यात आला. स्पीडब्रेकर काढल्यानंतर लगेच निर्माण झालेला खड्डा बुजवून त्यावर डांबर टाकायचे होते. मात्र वेळेवर माल उपलब्ध होऊ न शकल्याने ते काम अर्धवट पडून राहिले आहे. सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये डांबरीकरण केले जाईल. येथून वाहन चालवताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी. वाहन चालकांना सूचना देणारे फलक लावले जातील.
- दिलीप पावरा, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest