पुण्याचे बर्गरच ठरले खरे 'किंग'; अमेरिकेच्या ‘बर्गर किंग’विरुद्ध जिंकला १३ वर्षे जुना खटला
पुण्याच्या लोकप्रिय ‘बर्गर किंग’ या खाद्यपदार्थाने अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’विरुद्धची १३ वर्षे जुनी न्यायालयीन लढाई जिंकली आहे. समान नावावरून या दोघांमध्ये वाद होता. अमेरिकेच्या ‘बर्गर किंग’ने दाखल केलेल्या या खटल्यात जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी स्थानिक ‘बर्गर किंग’च्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे पुणेरी ‘बर्गर किंग’च खरे ‘किंग’ ठरले आहे.
फिर्यादी अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ने आपले प्रतिनिधी पंकज पाहुजा यांच्यामार्फत प्रतिवादी पुण्याच्या कोरेगाव पार्क आणि लष्कर भागातील ‘मेसर्स बर्गर किंग’चे मालक अनाहिता आणि शापूर इराणी यांच्याविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला होता. पुण्याच्या ‘बर्गर किंग’कडून वकील ॲड. ए. डी. सरवटे, ॲड. सृष्टी आंगणे आणि ॲड. राहुल परदेशी यांनी खटला चालवला. ‘ट्रेडमार्क’चे उल्लंघन, नुकसान भरपाई, पुण्याच्या ‘बर्गर किंग’ला आपल्या व्यवसाय चिन्हाच्या (ट्रेड मार्क) वापरावर कायमस्वरूपी मनाई आदी प्रतिबंधक आदेशांसाठी अमेरिकेच्या ‘बर्गर किंग’कडून हा खटला दाखल करण्यात आला होता. अमेरिकेच्या फिर्यादी ‘बर्गर किंग’च्या दाव्यानुसार ही कंपनी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील कायद्यांनुसार संचालित केली जाते.
ही कंपनी १९५४ मध्ये जेम्स मॅक्लामोर आणि डेव्हिड एडगर्टन यांनी स्थापन केली होती. त्यांनी ‘बर्गर किंग’ नावाने उपाहारगृह सुरू केले होते. या साखळी उपाहारगृह उद्योगाच्या अमेरिकेसह जगभरात शंभराहून अधिक देशांत १३ हजार फास्ट फूड उपाहारगृहांच्या शाखा आहेत. तसेच त्याचे ट्रेडमार्क आहे. या कंपनीने १९८२ मध्ये आशियात आपल्या शाखा सुरू केल्या आहेत आणि सध्या या कंपनीची आशियात १,२०० हून अधिक उपाहारगृहे आहेत. ‘बर्गर किंग’ हे व्यवसाय चिन्ह आणि व्यावसायिक नाव १९५४ पासून ते वापरत आहेत. या कंपनीने २०१४ पासून नवी दिल्लीत आणि नंतर मुंबई आणि पुण्यात आपली उपाहारगृहे सुरू केली. या फिर्यादी कंपनीला २००८ मध्ये पुण्यात सारख्याच नावाने आधीच उपाहारगृह सुरू असल्याची माहिती मिळाली.
अमेरिकेच्या कंपनीने ही माहिती समजताच जून २००९ मध्ये आपल्या वकिलांमार्फत पुण्यातील ‘बर्गर किंग’ला आपला व्यवसाय थांबवण्याची नोटीस बजावून कायदेशीर संघर्ष टाळून परस्पर सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव दिला. ‘‘अमेरिकन कंपनीची उत्पादने आणि सेवांचा उच्च दर्जा असल्याने ‘बर्गर किंग’च्या ‘ट्रेड मार्क’ला प्रचंड प्रतिष्ठा आहे. भारतातही या कंपनीच्या उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे या कंपनीचे चांगले नाव झाले आहे. मात्र, अशाप्रकारे या अमेरिकन कंपनीच्या समान नावाने अन्य भारतीय कंपनीच्या सेवेमुळे अमेरिकन कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. या कंपनीच्या व्यवसायचिन्हाचा वापर करणे अवैध आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला हानिकारक आणि फसवणूक करणारे आहे,’’ असा दावा अमेरिकेच्या कंपनीकडून करण्यात आला होता.
मात्र, या प्रकरणी तडजोड झाली नाही. हा खटला १३ वर्षे चालला. जिल्हा न्यायाधीश वेदपाठक यांनी अमेरिकन कंपनी ‘बर्गर किंग’ची याचिका फेटाळताना नमूद केले, की, ‘‘पुण्याचे ‘बर्गर किंग’ हे व्यवसाय चिन्ह १९९२-१९९३ पासून वापरत आहे. अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ने भारतात या नावाने उपाहारगृह व्यवसाय नोंदणी केली, त्या आधीपासून पुण्याचे ‘बर्गर किंग’ हे व्यवसायचिन्ह वापरत आहे.’’
सातत्यपूर्ण सेवा फळाला आली...
न्यायालयाने आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली. ‘‘बर्गर किंग कॉर्पोरेशन भारतात सुमारे ३० वर्षांपासून हे व्यवसाय चिन्ह वापरत नव्हते. या काळात पुण्याचे ‘बर्गर किंग’ सातत्याने आपली सेवा देत होते. त्यामुळे पुण्याचे ‘बर्गर किंग’ या व्यवसायचिन्हाचा आणि नावाचा कुठलीही फसवणूक न करता कायदेशीर आणि प्रामाणिकपणे वापर करत आहे,’’ असा निर्वाळा देत न्यायालयाने पुण्याच्या ‘बर्गर किंग’च्या बाजूने हा निकाल दिला. सातत्यपूर्ण सेवेमुळे या प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षात पुण्याचे ‘बर्गर किंग’ विजयी ठरले. .
पुण्याच्या ‘बर्गर किंग’चे वकील ॲड. सरवटे यांच्यासह ॲड. अंगणे आणि ॲड. परदेशी यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे या कायदेशीर लढाइईत पुण्याच्या बर्गर किंगची प्रतिष्ठित आणि विश्वासू सेवा अबाधित राहण्यास मदत झाली. पुण्याच्या या प्रतिष्ठित उपाहारगृहाने अनेक दशकांपासून पुणेकर ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा दिली आहे. या निकालामुळे येत्या काळातही अशीच सेवा अखंडपणे देण्यास हे पुणेरी ‘बर्गर किंग’ सज्ज झाले आहे.