संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भरभरून मतदान झाले असल्याने निकाल काय लागणार, याची उत्सुकता गेल्या दोन दिवसांपासून शिगेला पोहोचली आहे. शनिवारी (दि. २३) पुण्याला लाभणाऱ्या विधानसभेच्या नव्या आठ शिलेदारांचा फैसला होणार आहे.
पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघात ५६.२१ टक्के, शिवाजीनगर ५१.७४, कोथरूड ५२.६८, खडकवासला ५६.५२, पर्वती ५६.१५, हडपसर ५०. ६१, पुणे कॅंटोन्मेंट ५२.५३ आणि कसबा मतदारसंघात ५९.९३ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी चार ते पावणेनऊ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोथरूड, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा, हडपसर या सात मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे. तर वडगाव शेरी या एकमेव मतदारसंघात थेट दुरंगी लढत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील आठ पैकी पाच मतदारसंघांतील विजयी उमेदवाराचे मताधिक्य हे पाच हजारांपेक्षा कमी राहिलेले आहे. त्यामध्ये खडकवासला, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि हडपसर या मतदारसंघांचा समावेश आहे.
बंडखोरांकडे लक्ष
शहरातील पर्वती, शिवाजीनगर, कसबा या मतदारसंघांत काँग्रेसचे बंडखोर तर हडपसर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. पुण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात बंडखोराला मतदारांनी नाकारले आहे. पण बंडखोराला मिळणाऱ्या मतदानामुळे अन्य प्रमुख उमेदवाराचा डाव विस्कटून पराभव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
निवडणूकमय वातावरण...
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खडकवासला, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघात आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे फ्लेक्स
काही ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव, तर दुसरीकडे कोण जिंकणार यावर लाखो रुपयांच्या पैजा
मतमोजणी केंद्रांत आणि बाहेर काय दक्षता घ्यावी, यासाठी सर्वपक्षीय बैठका
एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार की खोटे, याची चौकाचौकात रंगली चर्चा
उमेदवारांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांसोबत गप्पा, देवदर्शन आणि खवय्येगिरी
कोरेगाव पार्क भारतीय खाद्य निगम गोदामाला छावणीचे स्वरूप
जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल
शिवाजीनगर : मतदानाचा कमी टक्का कुणाच्या पथ्यावर
पुणे शहराचा विचार केल्यास कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५८.७६ टक्के इतकं मतदान झालं. २०१९ च्या निवडणुकीत या ठिकाणी ५१ टक्के मतदान झालं होतं. तर शहरात सर्वाधिक कमी म्हणजे ५०.९० टक्के मतदान हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात झालं आहे. मात्र हे मतदान गेल्या वेळेच्या टक्केवारीच्या तुलनेत जास्त आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात केवळ ४४ टक्केक मतदान झालं होतं.
त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अद्याप तरी सर्वत्र सामने हे अटीतटीचे असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि खडकवासल्यातील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मात्र आपल्या नेत्याचा विजय निश्चित असल्याचं वाटत आहे.
विजयाचे अंतर कमी राहण्याची शक्यता
शनिवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी, महायुती, मनसे, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर योग्य प्रकारे मतमोजणी होत आहे की नाही, याकडे ते लक्ष देणार आहेत. मतदान यंत्र, मताची आकडेवारी यासह अन्य कोणत्याही गोष्टीबाबत गोंधळ दिसल्यास त्वरित आक्षेप नोंदविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ही निवडणूक चुरशीची असल्याने जय-पराजयातील अंतर कमी राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणावरून निघून जाऊ नये, असेही कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे.