प्रदूषणामुळे कोंडतोय रामनदीचा श्वास; बिल्डरकडून नदीत सांडपाणी आणि कचरा टाकला जात असल्याचे पुरावे देऊनही कारवाई नाही
भुकुम, भुगाव, पाषाण, सुतारवाडी या भागाची जीवनवाहिनी असलेल्या रामनदीत बावधन खुर्द येथील एका खासगी विकासकाने पर्यावरणाच्या नियमाविरुद्ध बेकायदेशीरपणे सांडपाणी सोडले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ९ मे रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही. अजूनही टँकरमधून ड्रेनेजची घाण रामनदीत टाकली जात असून त्याo0मुळे नदी दूषित होत आहे.
‘सीविक मिरर’शी बोलताना सामाजिक कार्यकर्ते कृणाल घरे म्हणाले, ‘‘पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत सातत्याने तक्रारी दिल्या आहेत. नदीत प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याचे पुरावेही दिले आहेत. या भागातील नागरिकांची जीवनवहिनी असलेली नदी या प्रदूषणामुळे गुदमरत आहे. नदीचे रूपांतर गटारगंगेत झाले आहे.’’
बावधन स्टार गेझ हाऊसिंग सोसायटीच्या रहिवासी मयूरी खालदार यांनी सांगितले की, ‘‘मी रामनदीच्या अगदी जवळ राहते. अंधाराचा फायदा घेऊन प्रक्रिया न केलेला कचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जात आहे. कचऱ्यामुळे पावसाळ्यात छोट्या पुलावरून रामनदी ओलांडणे कठीण होते. वर्षभरापूर्वी नाल्यांचे पाणी लोकांच्या घरात घुसले होते. यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. सांडपाणी आणि कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे, असा दावा केला जातो. परंतु त्यात तथ्य नाही. दररोज रात्री १० ते पहाटे २ या कालावधीत लहान ट्रक वापरून कचरा आणि सांडपाणी सोडणे सुरू आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याने राम नदी प्रदूषित झाली आहे. पाण्यावर पांढऱ्या रंगाचे बुडबुडे आणि फेस मोठ्या प्रमाणात तरंगत आहे. यामुळे प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. प्रक्रिया न केलेले पाणी सोडण्याचा परिणाम पांढऱ्या फेसाच्या रूपात दिसत आहे. यामुळे हवेत दुर्गंधी पसरते. त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये राहणे अशक्य झाले आहे.’’
‘सीविक मिरर’सोबत बोलताना महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक हनुमंत चाकणकर यांनी स्पष्ट केले की, ‘‘रोहन मधुबन सोसायटीकडून रामनदीमध्ये सांडपाणी टाकले जात असल्याच्या तक्रारी रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते कृणाल घारे यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. आम्ही निवडणुकीमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे कारवाई करू शकलो नाही, परंतु १५ मे रोजी सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीला सांडपाणी टाकणे बंद करण्याची नोटीस बजावण्यात येईल. तसे न केल्यास कायद्यानुसार योग्य ती प्रक्रिया केली जाईल.’’
आमच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच डम्पिंग होत असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल आणि चुकीचे कृत्य सिद्ध झाल्यास योग्य कायदेशीर कारवाई लागू केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) उप-प्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे यांनी सांगितले.
प्रदूषण नियंत्रण मंडळ पांढरा हत्ती झाल्याचा आरोप
माझी मुलगी नदीप्रेमी आहे. ती म्हणते की, रामनदी ही नदी नाही तर आता नाला झाला आहे. नदीच्या काठावर निळ्या रंगाचे पत्रे टाकण्यात आले आहेत. त्याच्या आडोशाने कचरा टाकला जातो. एक नामवंत बिल्डर रामनदीत सांडपाणी सोडत आहे. परंतु आम्ही त्यांना कायद्यात पकडू शकलो नाही. कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. बावधनच नव्हे तर संपूर्ण पुणे नदीत कचरा टाकण्यासाठी सायंकाळी ६ नंतर टँकर पाठवले जातात. कोरेगाव पार्क येथील नदीचा भागही नाल्यासारखा दिसत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हा पांढरा हत्ती झाला आहे. हे कार्यालय बंद करून टाकण्याची गरज आहे. आजपर्यंत त्यांनी आमच्या कोणत्याही तक्रारींकडे लक्ष दिले नाही, असा आरोप बावधन स्टार गेझ हाऊसिंग सोसायटीच्या रहिवासी मयूरी खालदार यांनी केला.