मेट्रोने पळवले पुणेकरांच्या तोंडचे पाणी; ५० हजारांहून अधिक कुटुंबांचा पाणीपुरवठा विस्कळीत

मेट्रोचे काम सुरू असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य पाण्याची वाहिनी फुटल्याने शनिवारी (९ सप्टेंबर) सकाळी औंध आणि परिसरातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 10 Sep 2023
  • 01:31 pm
 Water supply

५० हजारांहून अधिक कुटुंबांचा पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य जलवाहिनी तोडल्याने औंध व परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत; महापालिका वसूल करणार दंड

मेट्रोचे काम सुरू असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य पाण्याची वाहिनी फुटल्याने शनिवारी (९ सप्टेंबर) सकाळी औंध आणि परिसरातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याची गंभीर दखल महापालिकेने घेतली असून बांधकामाच्या दरम्यान जलवाहिनीचे वारंवार नुकसान केल्याबद्दल मेट्रो प्राधिकरणाला दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणी साचले होते, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

 मॉडर्न स्कूलसमोरील १२०० मीटरची जलवाहिनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) रात्री फुटली.  त्यामुळे औंध रस्ता, भाऊपाटील रस्ता, चिखलवाडी, मानाजी बाग, पुणे विद्यापीठ, खडकी स्टेशन आणि बोपोडीतील काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. शनिवारी सकाळी औंध परिसराला पाणीपुरवठा झाला नाही. जलवाहिनी दुरुस्त केल्यानंतर शनिवारी दुपारी पाणीपुरवठा पूर्ववत झाला.

मेट्रोचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. वारंवार असे प्रकार घडत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये याच ठिकाणी मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे  औंध परिसरात तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली होती.  

औंध रस्त्यावरील रहिवासी रमेश चौधरी म्हणाले, संपूर्ण परिसराला दररोज पहाटे साडेपाच ते नऊ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, मात्र शनिवारी सकाळी पाणीपुरवठा झाला नाही. नंतर आम्हाला समजले की मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली होती, त्यामुळे पाणीपुरवठा होत नव्हता.

आमचे नशीब थोर म्हणून यावेळी जलवाहिनीची दुरुस्ती लवकर झाली. गेल्या वर्षी संपूर्ण परिसरात तीन दिवस पाणी नव्हते. शनिवारी सकाळी पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना खूप त्रास झाला. 

एवढ्या मोठ्या मेट्रो प्रकल्पासोबत काही तरी नियोजन व्हायला हवे. मेट्रोकडून बेशिस्तपणे सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची भावना नवनीत परदेशी यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना  व्यक्त केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest