संग्रहित छायाचित्र
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात दरवर्षी आरटीईचे सर्वाधिक प्रवेश होतात. यंदा 970 शाळांमध्ये आरटीईच्या १७,५८८ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४८,१५५ अर्ज आले. त्यामुळे पहिली यादी आणि तीन प्रतीक्षा यादी मिळून पुणे जिल्ह्यात तब्बल १३,६६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. परंतु आणखी एक विशेष फेरी राबविण्याची मागणी पालक संघटनांनी केली आहे.
‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा राज्यात ७८ हजार ३९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशासाठी यंदा प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे एक नियमित फेरी आणि तीन फेर्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आल्या. तरीदेखील २६,८४० जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यामध्ये पहिल्या यादीत १६,३३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी १०,४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. पहिल्या प्रतीक्षा यादीत ४,६७२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी २,२९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसर्या प्रतीक्षा यादीत १,६०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी ७१४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तिसर्या प्रतीक्षा यादीत ५८४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी २५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवण्यात येते. यामध्ये आर्थिक वंचित आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये उपलब्ध जागांच्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची संधी देण्यात येते. संबंधित इंग्रजी शाळांचे शुल्क शासनाद्वारे आरटीई शुल्कप्रतीपूर्तीच्या माध्यमातून संबंधित शाळांना देण्यात येत असते.
‘‘आरटीई प्रवेश मुळात तीन महिने उशिरा सुरू झाली होती. तसेच न्यायालयातील अनेक याचिका, खासगी शाळांचा नकार आणि कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ अशी भीषण अवस्था होती. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशापासून हजारो मुले-मुली वंचित आहेत. त्यांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित राहिला नाही. विशेष फेरी घ्यायला पाहिजे होती. परंतु किमान पुढील वर्षी जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी, अशी अपेक्षा सम्यक फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक आनंद रणधीर यांनी व्यक्त केली.
शिक्षण विभाग अधिकारी करत होते त्रुटी काढून आर्थिक तडजोड
आम आदमी पक्षाच्या पालक युनियनचे समन्वयक मुकुंद कीर्दत म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्रुटी काढून आर्थिक तडजोड करत होते. त्यामुळे पालक हतबल होते. एकीकडे शाळा प्रशासन तुच्छतेची वागणूक देत होती, तर दुसरीकडे कागदपत्रे मिळविण्यासाठी तसेच लॉटरीमध्ये नाव येण्यासाठी पडताळणी समितीतील शिक्षण अधिकारी आर्थिक लूट करत होते. तक्रार निवारण केंद्र केवळ कागदावर होते. आरटीई प्रवेशापासून हजारो वंचित विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी घ्यावी अशी मागणी केली होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती आहे.’’
प्रवेशप्रक्रिया पूर्ण
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी म्हणाले, ‘‘यंदा राज्यातील ९,२१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २३८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी २ लाख ४२ हजार ५१६ पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले होते. या अर्जांतून पहिल्या नियमित यादीमध्ये ९३,००९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यातील ६०,९८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यासाठी सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन वेळा फेरी राबविण्यात आली. या फेर्यांमध्येदेखील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. या वर्षीची आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर संपली असल्याचे जाहीर केले आहे."
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.