प्रातिनिधिक छायाचित्र....
पुणे : व्यसनमुक्तीसाठी सरकारकडून जनजागृती केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूने देशी दारूच्या दुकानांना परवानगी दिली जात आहे. तरुण पिढी दारुच्या आहारी जात असून स्वत:चे भविष्य धोक्यात घातले जात आहे. खराडीतील थिटे वस्ती परिसरात असेच एक देशी दारुचे दुकान रहिवासी सोसायटीमध्ये सुरु केले जाणार आहे. या दुकानाला या सोसायटीतील नागरिकांसह इतर नागरिकांनी देखील विरोध केला आहे. प्रशासनाने जर देशी दारुच्या दुकानाला परवाना दिला त्या विरोधात रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे.
खराडीतील थिटे वस्ती परिसरात व्हिनस गार्डन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या नावाने रहिवासी सोसायटी आहे. या सोसायटीच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये बिअर, वाईन शॉपी सुरु आहे. तसेच इतर खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने आहेत. या ठिकाणी तळीरामांचा अड्डा तयार झाला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत तळीरामांचा या ठिकाणी ठिय्या असतो. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या - येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्रास सहन करावा लागत आहे. महिला-मुलींना या रस्त्याने जाणे मुश्किल झाले आहे. मात्र यावर तक्रार करुनही कोणी पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. असे येथील नागरिकांनी सीविक मिररला सांगितले.
व्हिनस गार्डन सोसायटीमधील दुकान क्रमांक ९ दुकान देशी दारूसाठी भाड्याने दिले जाणार आहे. हे दुकान दारूसाठी भाडेकरारावर दिल्यास सोसायटीतील व परिसरातील लहान मुले, स्त्रीया, वृद्ध यांच्या मानसिक आरोग्यास बाधा निर्माण होईल. तसेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची दाट भीती आहे. यामुळे हे दुकान दारूच्या विक्रीसाठी देऊ नये. अशी मागणी करणारे निवेदन येथील नागरिकांनी आमदार बापूसाहेब पठारे यांना दिले आहे.
त्यावर पठारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहिले असून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी देशी दारुच्या दुकानाला परवाना देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. सोसायटीचे चेअरमन सुधीर ढमढेरे, सेक्रेटरी उपेंद्र सहानी, खजिनदार रवी हलखेडे यांच्यासह इतर नागरिकांनी निवदेन दिले आहे. दरम्यान, यापरिसरातील तळीरामांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा चंदननगर पोलिसांनी दिला आहे.