पुणे नगरसेवक भाजपात प्रवेश
महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी पाज नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन सोडत हाती कमळ घेतलं आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपची आधीच पुण्यात ताकद असताना आणखी ताकद वाढली आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळं अंतर्गत नाराजीचा सुर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण सुनील कांबळे राजेश पांडे शहराध्यक्ष धीरज घाटे हे उपस्थित होते.
पुण्यात ठाकरे गटाचे एकूण 10 नगरसेवक होते. दोन गट पडल्यानंतर नाना भानगिरे हे शिंदे गटात गेले. त्यानंतर आता त्यामधील पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये केले. तर उरलेले चार माजी नगरसेवक हे ठाकरे गटासोबत आहेत. यामुळे पुण्यात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी काही राजकीय पक्षांमध्ये विशेषत: सत्ताधारी पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.