Pune | बंटस्‌ समाजाने स्वतःसह इतर समाजालाही जोडण्याचे काम केले - मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे बंटस्‌ संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे बंटस्‌ संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या पुढाकारातून बालेवाडी क्रीडा संकुलात "आंतरराष्ट्रीय बंटस्‌ क्रीडा महोत्सवा"चे आयोजन करण्यात आले होते.

Pune city news,

Bunts Sangha Pune...

पुणे : " बंटस्‌ (शेट्टी) समाजाने व्यावसाय, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या समाजाला एकत्रित ठेवण्याचे काम केले आहे. केवळ तेवढेच नाही, तर इतर समाजाला देखील त्यांनी वैविध्यपूर्ण उपक्रमाद्वारे आपल्या समाजाशी जोडण्याचे काम केले, ' असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

पुणे बंटस्‌ संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुणे बंटस्‌ संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या पुढाकारातून बालेवाडी क्रीडा संकुलात "आंतरराष्ट्रीय बंटस्‌ क्रीडा महोत्सवा"चे आयोजन केले होते. या क्रीडा महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. यावेळी पुणे बंटस्‌ संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी, वाय.चंद्रहास शेट्टी, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राकेश शेट्टी, दिनेश शेट्टी, नारायण हेगडे, सुधाकर शेट्टी, अजित हेगडे, शेखर रेड्डी, संयुक्त अरब अमिराती (यूएई) बंटस्‌ संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण शेट्टी आदी उपस्थित होते. पटना कबड्डी संघाचा खेळाडू व तरुण कबड्डीपटू प्रशांत राय, जया शेट्टी व छाया शेट्टी या दाम्पत्यासह माला शेखर शेट्टी व बाळकृष्ण शेट्टी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत देश - परदेशातील समाजाच्या 21 बंटस्‌ संघानी कबड्डी, थ्रो बॉल व व्हॉलिबॉल अशा खेळांमध्ये आपला सहभाग नोंदविला. 

मंत्री पाटील म्हणाले, "आपल्या व्यवसायास पूर्ण वेळ देतानाच खेळासाठी बंटस्‌ संघाचे सदस्य कसा वेळ देतात हा माझ्यापुढे पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांसह देशाच्या वेगवेगळ्या भागातील तसेच इतर देशातील बंटस्‌ संघाचे सदस्य खेळाच्या एकात्मिक भावनेतून एकत्र आले. संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा क्रीडा महोत्सव पार पाडत आहे. त्यांचे उत्साही व्यक्तिमत्व आपल्या तरुणाईला प्रेरणा देण्याचे काम करते. पाच वर्षांपूर्वी बंटस्‌ समाजाने पुण्यात बंटारा भवन बांधले, त्याचा केवळ बंटस्‌ समाजालाच नव्हे, तर इतर समाजाला ही चांगला फायदा होऊ लागला आहे. समाज बांधवांसाठी बिनव्याजी कर्जाची सोय त्यांनी उपलब्ध करून देत एकमेकांना मदतीचा हात दिला आहे.' 

संतोष शेट्टी म्हणाले, "भारतासह विविध देशात बंटस्‌ समाज उद्योग - व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेला आहे. पुणे बंटस्‌ संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित क्रीडा महोत्सवाद्वारे या विखुरलेल्या सगळ्या बंटस्‌ संघाच्या सदस्यांना एकत्र आणण्याचे काम आमच्यातर्फे करण्यात आले. यानिमित्ताने व्यावसायिक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक देवाण घेवाण करण्याचे काम होऊ शकले.' 

क्रीडा स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : कबड्डी : प्रथम क्रमांक - मुंबई बंटस्‌ संघ, द्वितीय क्रमांक - पुणे बंटस्‌ असोसिएशन, तृतीय क्रमांक - हेबरी बंटस्‌. व्हॉलिबॉल : प्रथम क्रमांक - गंटीहोले बंटस्‌, द्वितीय क्रमांक - सुरतकल बंटस्‌, तृतीय क्रमांक - पिंपरी चिंचवड बंटस्‌, थ्रोबॉल (महिला) : प्रथम क्रमांक - बंटस्‌ बजगोली, द्वितीय क्रमांक - हेबरी बंटस्‌, तृतीय क्रमांक - गुरुपुरा बंटस्‌. 

Share this story

Latest