राज्यात 'एचएमपीव्ही' धडकला; व्हायरसला रोखण्यासाठी पुणे महापालिका सज्ज
पुणे : चीनमध्ये एचएमपीव्ही या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातही या विषाणूचा शिरकाव झाला आहे. नागपूरमध्ये दोन संशयित रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली होती. देशात एचएमपीव्हीचे वाढते रुग्ण पाहता पुणे महापालिका सतर्क झाली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.
राज्यसरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने एचएमपीव्हीचा संसर्गाबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. शहरातील नायडू रुग्णालयामध्ये ५० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच अतिदक्षता विभाग कक्ष देखील उभारण्यात आले आहेत. करोनाच्या महामारीमध्ये पुणे शहर हे एक हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी महापालिकेकडून आत्ताच ५० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. भविष्यात एचएमपीव्हीची साथ वाढल्यास त्यासाठी नायडू रुग्णालयांत विलगीकरणासाठी ३५० रुग्णशय्यांची व्यवस्था आहे. याचबरोबर खासगी रुग्णालयांची मदत घेऊन विलगीकरणासाठी ३ हजार ५०० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोऱ्हाडे काय म्हणाल्या?
"पुणे महापालिकेच्या हद्दीत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या व्हायरसच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास या व्हायरसचा शोध २००१ मध्येच लागला होता. तेव्हापासून हा व्हायरस कशाप्रकारे रोग पसरवतो या अनुषंगाने बोलायचे झाल्यास हा व्हायरस श्वसनसंस्थेला संक्रमित करतो. हा साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे. त्यामध्ये फ्लू सारखी अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणे असतात. यामध्ये सर्दी, खोकला किंवा ताप असू शकतो. या व्हायरसचं इन्फेक्शन हे सेल्फ लिमीटिंग असते. तीन ते पाच दिवसांमध्ये आजार बरा होतो. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना न्यूमोनिया होवू शकतो."
"एचएमपीव्ही मुळे होणारा आजार हा विषाणूजन्य आजार आहे. एचएमपीव्ही हा एक विषाणू आहे. साधारण कुठलेही किरकोळ व्हायरल इन्फेक्शन हे सेल्फ लिमीटिंग असते. त्याला वेगळ्या विशिष्ट औषोधोपराची गरज नसते. फ्लू, सर्दी, खोकल्यासाठी जी ट्रीटमेंट देतो अशाच स्वरूपाच्या उपचाराची गरज रुग्णाला असते. असे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत."