२०० हून अधिक मोबाईल टॉवरची चोरी, ५ जणांना अटक
राज्यात सुरू असलेल्या मोबाईल टॉवर चोरीच्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी टॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांतील मोबाईल टॉवर चोरीच्या गुन्ह्यांची उकल पुणे ग्रामीण पोलीसांनी केली आहे.
रमेश मल्लाप्पा गरसांगी (३३), प्रशांत वामन यादव (३१), सुहास श्रीराम लाड (४०), जावेद हमीदुल्ला खान (३३) आणि सचिन गणपत कदम (४१) अशी आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघे जीटीएल इन्फ्रा कंपनीचे कर्मचारी आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, GTL इन्फ्रा लिमिटेड कंपनीने २००८ मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामंध्ये मोबाईल टॉवर उभारले होते. मात्र, अनेक शहरातील टॉवर बंद पडले आहेत. चोरटे अशा गैर-कार्यरत असलेल्या टॉवरचा शोध घ्यायचे. त्या टॉवरचे बनावट कागदपत्रे आणि लेटरहेड तयार करून जमीन मालकांशी संपर्क साधत होते. आम्ही GTL कंपनीचे कर्मचारी आहेत, असे जमीन मालकाला सांगून संबंधित बंद असलेले टॉवर चोरून न्यायचे.
विशेष म्हणजे कंपनीच्या अधिकार्यांनी स्वतःच टॉवर काढले आहेत असे वाटल्याने जमीन मालक याबाबत कंपनीकडे कधीही तक्रार करत नव्हते. चोरट्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक टॉवरची चोरी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. टॉवर चोरीचे प्रकरण लक्षात आल्यानंतर अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीसांकडे तक्रार केली.
यामध्ये महाराष्ट्रातील चोरीच्या तक्रारीसह पुण्यातील कारेगाव आणि रांजनगाव पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे मोबाईल टॉवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी कर्नाटकातून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.