संग्रहित छायाचित्र
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा येथे नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या आयटीआय प्रशिक्षण केंद्रात एकूण ९ विविध व्यावसायिक कोर्सेचे प्रशिक्षण मिळणार असून वर्षभरात जवळपास पावने चारशे विद्यार्थांना त्याचा लाभ मिळणार आहे.
वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी येरवडा येथे आयटीआय प्रशिक्षण केंद्र सुरू करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात येरवडा येथे आयटीआय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाकडून प्रक्रिया सुरू होती. बुधवारी येथील आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठीचा अभ्यासक्रम, पदनिर्मिती व त्यासाठीच्या आवश्य्यक खर्चास मंजुरी देण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने काढले आहेत.
हे कोर्स शिकविणार
येरवडा येथील आयटीआय प्रशिक्षण केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोगॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टुल अॅण्ड डायमेकर, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मे़कॅनिक ऑटो पेटिंग, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या पदांचा समावेश आहे. त्यात एकूण ३७६ विद्यार्थांना प्रशिक्षण मिळणार असून त्यासाठी ४० विविध पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे.
“विधानसभा निवडणूकीत नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीबरोबरच रोजगार निर्मितीचे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार येरवडा येथे आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला. हे संस्थेतून प्रशिक्षण घेऊन चाकण, राजंगणगाव परिसरात रोजगाराच्या संधी निश्चितपणे उपलब्ध होतील असा विश्वास आहे”, असे मत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी व्यक्त केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.