Pune: हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १४० कोटीचा निधी ‘मुद्रांक’कडे थकीत

पुणे: हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सुमारे १४० कोटी रुपयांचा निधी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे थकीत आहे. होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात हे निधीवाटप अडकल्याने अनेक चांगल्या योजना व कामे रखडली जाणार

संग्रहित छायाचित्र

हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळत नसल्याने विकास ठप्प

(सुनील जगताप)
पुणे: हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सुमारे १४० कोटी रुपयांचा निधी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे थकीत आहे. होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात हे निधीवाटप अडकल्याने अनेक चांगल्या योजना व कामे रखडली जाणार आहेत, असे मत तालुक्यातील अनेक सरपंचांनी  व्यक्त केले आहे. हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळत नसल्याने विकास ठप्प झाला आहे. (Latest News Pune)

शासनाचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग ग्रामपंचायतींना त्यांच्याकडे नोंद झालेल्या दस्तांवरून मिळालेल्या मुद्रांक शुल्कामधील १ टक्का मुद्रांक शुल्क त्या त्या तालुक्यातील गावांच्या विकास निधीसाठी देत असतात. या एक टक्क्यामध्ये ५० टक्के रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे, २५ टक्के रक्कम जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना तसेच २५ टक्के रक्कम पीएमआरडीला विकास कामांसाठी अशा पद्धतीने  वाटप ठरलेले असते. मात्र हा मुद्रांक शुल्क निधी पूर्णपणे नोंदणी आणि मुद्रांक विभाग जिल्हा प्रशासनाकडे देतोच असे नाही. तो नेहमी कमी प्रमाणात दिल्याने  २०११ पासून केवळ हवेली तालुक्याचा सुमारे १४० कोटींचा मुद्रांक शुल्क निधीमधील वाटा अद्याप शासनाकडून येणे बाकी आहे, अशी माहिती उरुळी कांचनचे माजी सरपंच राजेंद्र कांचन यांनी ‘सीविक मिरर’ला दिली. (Pune News)

हवेली पंचायत समितीकडून जिल्हा परिषद कार्यालयाकडे तालुक्यातील २७ सहायक नोंदणी निबंधक कार्यालयाकडील दस्त नोंदणींची आणि त्यापोटी मिळालेल्या मुद्रांक शुल्काची यादी सादर केली नसल्याने, नोंदणी आणि मुद्रांक शाखेकडून आलेला निधी वाटप सध्या थांबले आहे. सध्या मुद्रांक विभागाकडून ११३ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क निधी पुणे जिल्ह्यासाठी दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.  याबाबत जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय नलावडे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ‘‘फक्त १८ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. मात्र हवेली पंचायत समितीकडून त्यांच्या अखत्यारित असलेल्या २७ सहायक नोंदणी निबंधक कार्यालयांकडून दस्त नोंदणीची यादी अद्याप प्राप्त झाली नसल्याने निधीवाटप थांबले आहे. अन्य तालुक्यांमधील सहायक नोंदणी निबंधक कार्यालयाकडून दस्त नोंदणीच्या याद्या प्राप्त झालेल्या आहेत.  त्यामुळे आता आम्ही हवेली तालुक्याच्या याद्यांची वाट न बघता आलेला निधी इतर तालुक्यांना वितरित करण्याची प्रक्रिया चार दिवसात पार पाडत आहोत.’’

याबाबत हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी म्हणाले,  माझ्याकडे हवेली तालुक्यातील २७ पैकी १२ सहायक निबंधक कार्यालयांकडून याद्या प्राप्त झालेल्या आहेत, तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे देणार आहे. मात्र शासकीय कार्यालयातील कागदावरील खेळाने ग्रामीण भागातील गावांचा विकास रखडला जातो. मला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी अनेक गावांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest