पुण्यातील DRDO संचालकांना एटीएसकडून अटक
पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओचे संचालक आणि जेष्ठ शास्त्रज्ञ एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. पाकची गुप्तचर संघटना आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या संचालकांनी संरक्षण माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर असे अटक केलेल्या संचालकांचे नाव आहे.
डॉ. प्रदीप कुरूलकर हे पुण्यातील आळंदी रोड येथे असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रीमियर सिस्टम इंजिनीअरिंग प्रयोगशाळेत संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून १९८५ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी (BE) पूर्ण केली होती. तर १९८८ मध्ये चेन्नईतील कॉम्बॅट व्हेइकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (CVRDE) प्रयोगशाळेत प्रवेश घेतला होता.
तसेच कुरुलकर यांनी आयआयटी कानपूरमधून पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधील पुढील अभ्यासक्रम पूर्ण केले. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, लष्करी उपकरणे, रोबोटिक्स व लष्करात उपयोगी ठरणाऱ्या मानवरहित मोबाइल तंत्रज्ञान, उपकरणांचे डिझाइन तसेच विकासात कुरुलकर यांचे प्रावीण्य होते. त्यांनी ६ वर्षे दिवंगत शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासमवेत विविध प्रकल्पांत काम केले होते. याशिवाय, त्यांनी विविध प्रकारच्या पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले होते.
मात्र, जबाबदार पदावर असूनही, DRDO अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संवेदनशील सरकारी संवेदनशील माहिती बाहेर पाठवली, जी शत्रू राष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने, काळाचौकी, मुंबई, यांनी ऑफिशीयल सीक्रेट कायदा १९२३ च्या कलम १९२३ आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एटीएसने गुरुवारी कुरुलकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. सध्या एटीएसचे पथक याबाबतचा अधिक तपास करत आहेत.