संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बापट कुटुंबियांच्या भेटीला
पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या गेल्या महिन्यात निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज बापट कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी राजनाथ सिंग यांनी गिरीष बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले.
राजनाथ सिंग हे आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंग गिरीष बापट यांच्या घरी पोहोचले. राजनाथ सिंग आणि गिरीष बापट यांच्या मैत्रीपुर्ण संबंध होते. त्यांनी आज बापट कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याबाबत गौरव बापट यांनी माहिती दिली. दरम्यान, बापटांच्या निधनानंतर देखील राजनाथ सिंग यांनी शोक व्यक्त केला होता.
राजनाथ सिंग यांच्या सांत्वनानंतर माध्यमांना माहिती देताना गौरव बापट म्हणाले की, “राजनाथ सिंग आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांचे काही नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमातून वेळात वेळ काढून ते आमच्या परिवाराला भेटण्यासाठी, माझ्या आईला भेटण्यासाठी आले होते. २०१९ साली बापट साहेब खासदार झाले मात्र, त्या अगोदरपासून २००३ सालापासून राजनाथ सिंग आणि आमचा चांगला संबंध राहिलेला आहे. ते राष्ट्रीय पातळीवर असताना देखील बाबांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. त्यामुळे त्याच आठवणीने ते आज आले होते.त्यांनी आज आमच्या परिवाराची, माझ्या आईची, आज्जीची, सासूबाई आणि बायकोचीही भेट घेतली. ते आता पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले आहेत.”