पुणे : बंटी-बबलीने चोरल्या आठ कार, नऊ दुचाकी

वेगवेगळ्या भागांमधून कार, दुचाकी आणि मोटारसायकल्सची चोरी करणाऱ्या सराईत दाम्पत्याला सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले आहे. सासवड रस्त्यावर असलेल्या वडकीनाला भागात ही कारवाई करण्यात आली. या बंटी आणि बबलीकडून १२ लाख ७० हजार रुपयांच्या आठ कार आणि नऊ दुचाकी अशी १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.  

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Edited By Admin
  • Sun, 16 Jun 2024
  • 01:05 pm
Pune news

संग्रहित छायाचित्र

सराईत वाहनचोर दाम्पत्य गजाआड, सिंहगड पोलिसांची सासवड परिसरात कारवाई

वेगवेगळ्या भागांमधून कार, दुचाकी आणि मोटारसायकल्सची चोरी करणाऱ्या सराईत दाम्पत्याला सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले आहे. सासवड रस्त्यावर असलेल्या वडकीनाला भागात ही कारवाई करण्यात आली. या बंटी आणि बबलीकडून १२ लाख ७० हजार रुपयांच्या आठ कार आणि नऊ दुचाकी अशी १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.  

शाहरुख राजू पठाण (वय २४) आणि आएशा शाहरुख पठाण उर्फ पूजा जयदेव मदनाल (वय २१, दोघे रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या बंटी आणि बबलीची नावे आहेत.

सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण दाम्पत्यावर यापूर्वीदेखील वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. मागील काही दिवसांत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचे गुन्हे वाढले होते. परीमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या गुन्ह्यांना आळा घालून चोरट्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मागील दोन महिन्यांपासून सिंहगड रस्ता पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत होती.  

पठाण दाम्पत्याने या चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले होते. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले होते. आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवले. त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सासवड रस्त्यावर हे दोघे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, या भागात सापळा लावण्यात आला. त्यांच्याकडे केलेल्या तपासात या दोघांनी मिळून सिंहगड रस्ता, हडपसर, वारजे माळवाडी, कोरेगाव पार्क भागातून वाहनांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
पठाण दाम्पत्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी पुणे शहर परिसरातून चोरलेल्या वाहनांची विक्री नागपूर तसेच शिर्डी परिसरात केल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, उत्तम तारू, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest