पुणे: कात्रज परिसरात फॉरेन सिटी एक्झिबिशनमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कात्रज परिसरात फॉरेन सिटी एक्झिबेशनमध्ये वडिलांसोबत गेलेल्या आठ वर्षांच्या शालेय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आनंद मेळाव्यात मौजमजा करण्याकरिता बाहेर पडलेल्या मुलाचा अशा रितीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कात्रज परिसरात फॉरेन सिटी एक्झिबिशनमध्ये गेलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आनंद मेळाव्याने हिरावला आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा; आरोपींवर गुन्हा दाखल

चैत्राली देशमुख -ताजणे/अमोल अवचिते
कात्रज (Katraj) परिसरात फॉरेन सिटी एक्झिबेशनमध्ये (Foreign City Exhibition) वडिलांसोबत गेलेल्या आठ वर्षांच्या शालेय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. आनंद मेळाव्यात मौजमजा करण्याकरिता बाहेर पडलेल्या मुलाचा अशा रितीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६.३० वाजता कात्रज कोंढवा रस्त्यावरील मैदानावर घडली. गणेश राजू पवार (Ganesh Raju Pawar) (वय ८, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील राजू पांडू पवार (वय ३७) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद दिली आहे. फॉरेन सिटी एक्झिबेशनचे संयोजक, तसेच विद्युत पाळण्याचे मालक या घटनेस जबाबदार असल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शाळेची सहल जाणार असल्याने गणेश वडिलांसोबत खरेदीसाठी बाहेर पडला होता. त्यांनी सहलीची बॅग खरेदी केली. तसेच इतर खाद्यपदार्थदेखील घेतले. घरी परतत असताना आनंद मेळाव्यात मौजमजा करण्यासाठी हट्ट धरला. मुलाचा आनंद हाच आपला आनंद असे मानून वडील मुलाला मेळाव्यात घेऊन गेले. मात्र वडील-मुलाचा हा आनंद नियतीला मान्य नव्हता. पाळण्यात बसण्याचा आणि शाळेच्या सहलीचा आनंद लुटण्याआधीच अवघ्या आठ वर्षाच्या मुलाला काळाने हिरावून नेले.  

गणेशचे वडील फिर्यादी राजू पवार बावधन येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. या घटनेची माहिती ‘सीविक मिरर’ला सांगताना ते म्हणाले, ‘‘गणेशच्या शाळेची सहल जाणार होती. त्याच्यासाठी खरेदी करायची होती. सहलीसाठी बॅग आणि फराळाच्या इतर वस्तू खरेदी करून आम्ही दुचाकीवरून घराकडे निघालो होतो. त्यावेळी गणेशने या आनंद मेळाव्यात जाण्याचा हट्ट केला. या मेळाव्यात त्याच्या शाळेतील मित्रांनी आनंद लुटला होता. तशीच मजा गणेशला करायची होती. त्यामुळे गणेशने मेळाव्यात जाण्यासाठी आग्रह केला. मात्र आपण सर्वजण एकत्र येऊ, असे सांगून त्याची समजूत काढली होती. मेळाव्यात घेऊन जाण्यास नकार दिल्याने  तो नाराज झाला. तो दु:खी होऊ नये म्हणून मी त्याला मेळाव्यात घेऊन गेलो. प्रत्येकी १०० रुपये प्रवेश शुल्क भरून आत प्रवेश केला. मेळाव्यात प्रवेश करताच त्याला खूप आनंद झाला. त्याचा आनंद पाहून खूप छान वाटले. परंतु त्याचा हा आनंद फार काळासाठी नव्हता. पाळण्याजवळील जाळीला त्याचा स्पर्श झाला. विजेचा धक्का बसल्याने तो कोसळला. मी त्याला उचलून खांद्यावर घेतले. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेशने काहीही उत्तर दिले नाही. रुग्णालयात दाखल केले असता, तो आता आपल्यात राहिला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.’’ हा प्रसंग सांगताना गणेशच्या वडिलांच्या दु:खाचा बांध फुटला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा आचार्य गुरुकुलमध्ये दुसरीत शिकत होता. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत फॉरेन सिटी एक्झिबेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळणी आहेत. गणेश आणि त्याचे वडील तेथे गेले होते. त्यावेळी गणेश विद्युत पाळण्यात बसणार होता. तेथे असलेल्या जाळीत वीजप्रवाह उतरला होता. गणेशचा जाळीला स्पर्श झाला आणि विजेच्या झटक्याने तो कोसळला. या घटनेनंतर घबराट उडाली. विद्युत पाळण्याचा वीजप्रवाह त्वरित खंडित करण्यात आला. बेशुद्धावस्थेतील गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संयोजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन सिटी एक्झिबेशनमधील घटनास्थळी धाव घेतली. त्याची पाहणी केली असता, मेळाव्याचे आयोजन करताना संयोजकांनी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. विद्युत पाळण्याजवळ लोखंडी रॉडमध्ये वीजप्रवाह उतरल्यामुळे त्याला स्पर्श झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
- स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्रमांक दोन, पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest