'मेट्रो फिडर' बससेवेला प्रवाशांची पसंती, पीएमपीएमएलने महिनाभरात कमावले २६ लाखाचे उत्पन्न
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत ये-जा करण्याकरीता परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे अशा मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामधून सप्टेंबर महिन्यात पीएमपीएमएलला तब्बल २६ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
वनाज ते रूबी हॉल आणि शिवाजीनगर ते पिंपरी-चिंचवड मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. घरातून मेट्रो स्थानक आणि स्थानकापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना तत्काळ सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पीएमपीकडून शहरातील ६ मेट्रो स्थानकापासून फिडरसेवा सुरू करण्यात आली. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ स्थानकांपासून, अशा एकूण १० स्थानकापासून ही सेवा सुरू आहे. यामध्ये गेल्या महिनाभरात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पुण्यातील १ लाख ९४ हजार १२७ प्रवाशांनी लाख घेतला. त्यामधून २३ लाख ८२ हजार ८ रुपयांचे उत्पन्न पीएमपीएमएलला प्राप्त झाले. तर पिंपरी चिंचवडमधून १९ हजार ८३१ प्रवाशांनी लाभ घेतला असून पीएमपीला २ लाख ८८ हजार ५९४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
सध्या परिवहन महामंडळाकडून पुणे विभागामध्ये प्रवाशांचा चढ-उतार जास्त आहे. अशा मेट्रो स्टेशन येथून एकूण २२ बसेस व पिंपरी-चिंचवड विभागामध्ये ४ बसेस अशा एकुण २६ बसेस संचलनात आहेत. सध्या संचलनात असलेला बसमार्ग मेट्रो शटल क्र. ३७ या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने सदर मार्गात बदल करून पिंपरी मेट्रो स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन असा बदल करून ११ ऑक्टोंबर २०२३ पासून सुरू करण्यात आला आहे.
तसेच आगामी काळात रामवाडी पर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर रामवाडी मेट्रो स्टेशन या ठिकाणाहून महामंडळाकडून रामवाडी मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट अशी फिडर बससेवा ई-बसेस व्दारे सुरू करण्याचे नियोजीत असून सरासरी १५ मि. वारंवारितेने बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, सध्या महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या फिडर बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवासी नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.