PMC News : शहरातील ओढे- नाले, कालव्यांवरील पुलांचे होणार 'स्ट्रक्‍चरल ऑडीट'

पुणे : शहराच्या विविध भागातील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधलेले आहेत. मात्र पुलांची संख्या किती आहे, याची कोणतीही माहिती अद्याप महापालिकेकडे नाही. त्यामुळे आता यापुलांची माहिती घेतली जाणार असून 'स्ट्रक्चरल ऑडीट' केले जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Tue, 24 Dec 2024
  • 04:28 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : शहराच्या विविध भागातील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधलेले आहेत. मात्र पुलांची संख्या किती आहे, याची कोणतीही माहिती अद्याप महापालिकेकडे नाही. त्यामुळे आता यापुलांची माहिती घेतली जाणार असून 'स्ट्रक्चरल ऑडीट' केले जाणार आहे. 

शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. यावर पुल बांधण्यात आले आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाचे सध्या तरी कोणतेही लक्ष नाही. ओढ्यांवर स्लॅब टाकून पूल तयार करण्यात आलेले आहेत. हे पुल आता जुने आणि धोकादायक झाले आहेत. शहरात वाहतूक कोंडीची समस्येने नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे गल्लीबोलातील रस्त्यावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. या छोट्या पुलांवरुन वाहतूक होत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी पुलांची पाहणी केली जाणार असून स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाणार आहे. 

याबरोबरच मुठा डावा कालवा देखील शहरातुन ग्रामीण भागामध्ये जातो. संबंधित नाले, ओढे, कालव्यावर महापालिका प्रशासनाकडुन अनेक वर्षांपुर्वी छोटे-मोठे पुल बांधण्यात आले. या पुलांवरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. त्यापैकी काही पुल जुने झाले असल्याने ते धोकादायक झाले आहेत का ? संबंधित पुलांची सद्यःस्थिती नेमकी कशी आहे ? याबाबतची पाहणी महापालिकेकडुन केली जाणार आहे. या पुलांचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडुन स्ट्रक्‍चरल ऑडीट केले जाणार आहे, त्यातुन पुलांच्या सद्यःस्थितीची माहिती महापालिकेस मिळणार आहे. त्यानंतर पुलांच्या कामांसंदर्भात पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

याबाबत महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, "ओढे-नाले व कालव्यांवरील पुल सध्या सुरु आहेत. मात्र, या पुलांचे नेमकी काय स्थिती आहे, हे जाणुन घेणे गरजेचे आहे. त्यातुन पुलाची डागडुजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळणे शक्‍य होईल. त्यादृष्टीने या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याचे काम केले जाणार आहे.'

नदीवरील ३८ पैकी ११ पुलांचे काम पुर्ण...
महापालिकेने दोन वर्षांपुर्वी नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट केले होते. पुलांची कामे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपयांची तरतुद केली होती. परंतु महापालिकेने १५ कोटी रुपयेच मंजूर केले होते. त्यामुळे प्राधान्याने विशेष प्रकल्प विभागाने ११ पुलांची कामे केली. तर आता उर्वरीत २७ पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतुद केली जाणार आहे. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहे. त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest