आपली मराठी अभिजात मराठी

मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन। (ज्ञानेश्वरी अध्याय सहावा)

योगमार्गाचे संस्कृत ग्रंथातील वर्णन पारिभाषिक शब्दांत आहे. ते पारिभाषिक शब्द जसेच्या तसे न वापरता, प्राकृतात (मराठीत) योगमार्गाचे वर्णन ऐकायला जाणते, रसिक श्रोते तयार होतील का? ह्या शंकेचे समाधान प्रस्तुत ओवीत आहे. सध्याच्या काळातही हा प्रश्न अनेकांना पडतो. आधुनिक शास्त्रे इंग्लिशमधे आहेत, त्यातील विषय मराठीतून अचूक कसे व्यक्त होतील? असा प्रश्न आजकाल उपस्थित केला जाऊ शकतो. जेव्हा संत ज्ञानेश्वर गीतार्थ सांगत होते तेव्हाही  श्रोत्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. हा अठरा (काहींच्या मते सोळा) वर्षांचा मुलगा प्रयत्न करतो आहे ह्याचे कौतुक आहे. पण ते वर्णन जाणत्या रसिक श्रोत्यांना कितपत रुचेल? या प्रश्नावर ज्ञानेश्वरांनी दिलेले मराठी भाषेच्या सामर्थ्याचे हे वर्णन आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की, श्रोतेहो, याबाबत यत्किंचितही शंका नको.  मी अशी शब्दयोजना करेन की,मी केलेले वर्णन चांगले की अमृत? अशी स्पर्धा लावली तर मी केलेले वर्णन जिंकेल.

मराठी भाषेचे नेमके वय किती?
मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. मराठीला जवळपास २ हजारांहून अधिक काळचा इतिहास आहे. मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी २०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. २०१३ साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असे या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षं जुने असल्याचे पुरावे असल्याचे या अहवालात म्हटले होते. अकरा कोटी लोकांची मराठी जगातली १० व्या ते १५ व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध असल्याचेही या अहवालात म्हटले होते. कादंबरी, कथा, कविता, ललित लेख, नाटक, लोकसाहित्य, बालसाहित्य, विनोद, अग्रलेख-संपादकीय-स्तंभलेख, समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन,कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे अशा विविध माध्यमातून मराठी लोक अभिव्यक्त होतात. जगातील सर्वांत जुन्या भाषांमध्येही हे वैविध्य दिसून येत नाही. भाषेची शास्त्रीय मिमांसा करताना एवढी समृद्ध, संपन्न भाषा अन्यत्र दिसून येत नाही. 

भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात. 
- संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५०० ते २००० वर्षे प्राचीन असावा.
- या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
- प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात दर्जा मिळाल्याने असा होतो फायदा...  
- अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
- अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
- प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांचे सशक्तीकरण.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव मदत

आतापर्यंत सहा भाषांना मिळाला हा सन्मान
२००४ मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. तामिळनंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू, २०१३ मध्ये मल्याळम, २०१४ मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता.

विवेकसिंधु
हा मराठी भाषेतील काव्यग्रंथापैकी एक असलेला ग्रंथ, मुकुंदराज या कवीने लिहिला. हरिहरनाथ यांचे शिष्य रघुनाथ यांनी त्यांच्या मुकुंदराज या शिष्यास निवडून त्यास 'मराठी समाजास दिशा देणारा ग्रंथ हवा' अशा अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास सांगितले. त्यांनी रघुनाथांच्या समाधिस्थळी म्हणजे अंभोरा(सध्याच्या नागपूर जिल्ह्यात) येथे बसून हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० (म्हणजेच इसवी सन ११८८) सालातील असावी. या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत. हा ग्रंथ ओवी या छंदात रचला आहे. ओव्यांची संख्या १७०० आहे.

लीळाचरित्र
पंडित म्हाइंभट सराळेकर हे लीळाचरित्राचे कर्ते आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. लीळाचरित्र महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल ११७८ च्या आसपास. लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे.

ज्ञानेश्वरी
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.

दासबोध
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. दासबोधामध्ये एकूण ७७५० ओव्या आहेत. एकेक समास एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध.

भक्तिकाव्य-गाथा
ज्यांना तुका, तुकोबाराया, तुकोबा म्हणूनही ओळखले जाते, ते संत तुकाराम १७ व्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावातील वारकरी संप्रदायाचे हिंदू, मराठी संत होते. ते होते पंढरपूरच्या विठोबाचे भक्त. ते त्यांच्या भक्ती काव्यासाठी प्रसिद्ध आहेत , जे महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक कविता सामाजिक सुधारणांशी संबंधित आहेत. तुकाराम गाथा हे १६३२ ते १६५० च्या दरम्यान रचलेले त्यांच्या कृतींचे मराठी भाषेतील संकलन आहे. याला 'अभंगगाथा' असेही म्हणतात, भारतीय परंपरेनुसार त्यात सुमारे ४५०० अभंगांचा समावेश आहे.

एकनाथी भागवत
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. 'एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. 'रुक्मिणीस्वयंवर' हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी  ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली.

 मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य होती हे आता जगाला पटेल. मोदीजी, आपण माय मराठीचे पांग फेडले आहेत! पुन्हा एकवार धन्यवाद!
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

गेली अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रीमंडळाने ही मागणी मान्य केली. मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून यापुढे ओळखली जाणार आहे. हा क्षण सुवर्णअक्षरांत लिहिण्याचा दिवस आहे. मी मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी पुरावे दिले. हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या वतीने आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठी भाषिक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचे अतिशय मनापासून अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जण मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी इच्छा आणि हेच आमचे अंतिम ध्येय आहे.
- राज ठाकरे, मनसे प्रमुख

मराठी भाषेच्या इतिहासातील हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. मी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शेखावत यांचे मनापासून आभार व्यक्त करते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक भाषाप्रेमींबरोबर मीही मराठी भाषा समितीची अध्यक्ष या नात्याने प्रयत्न केले होते. ज्ञानेश्वरीसह अनेक विविध प्राचीन ग्रंथातून संदर्भ संकलित करून पुरावाधिष्ठित माहिती गोळा करून मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक भाषा तज्ज्ञांचे व अभ्यासकांचे हातभार लागले. या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.
- डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार, माजी अध्यक्ष, मराठी भाषा समिती

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही समाधानाची, आनंदाचीही, अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने ८ वर्षे अखंड लढा दिला. त्यासाठी  लोकचळवळ उभी केली. पंतप्रधान कार्यालयाला १ लाख पत्र पाठवली. या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला. सगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केले. या सगळ्यांना यश आले. त्यामुळे आता मराठी भाषिकांची जबाबदारी वाढली आहे. मराठी शाळांची घटती संख्या, ग्रंथालयांची दुरवस्था या समस्यांवर मत करण्यासाठी सगळ्यांनाच नवी ऊर्जा मिळेल, असे वाटते.
- मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद  

मराठी भाषेला भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल सर्वप्रथम भारत सरकारचे मनापासून आभार.मराठी भाषा ही भारतीय परंपरेतील एक प्राचीन आणि वैविध्यपूर्ण निर्मिती करणारी भाषा आहे... मराठी भाषेत जी वैविध्यपूर्णता आहे तेवढी वैविध्यता क्वचितच इतर भारतीय भाषांत असेल. पुन्हा केंद्र सरकारचे मनापासून आभार.
- रवींद्र शोभणे, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ज्यांनी मोर्चे, आंदोलने आणि पत्रव्यवहार केला. लेखक, वाचक आणि मराठी भाषिक जनतेने जो संघर्ष केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. केंद्र सरकारने उशिरा का होईना न्याय दिला आहे. सरकारने १२ कोटी जनतेचे पुण्य वाटून घेतले आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचे मी अभिनंदन करतो. 
- श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या चळवळीला पहिला वेग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पाच लाख पोस्टकार्डस् पंतप्रधानांना पाठवण्याची जी मोहीम हाती घेतली व पंचवीस हजार पोस्टकार्ड एकाच दिवशी आम्ही सातारा येथून पोस्ट केली तेंव्हापासून आलेला होता. यासाठी पुढे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे सर्व पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याला माध्यमांनी उत्तम साथ दिली. या साऱ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राने आजवर दहा वर्षं रोखून धरलेला हात दर्जा जाहीर केला, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
- श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest