बागेश्वर धाम सरकारच्या 'दिव्य दरबार'ला विरोध
पुणे : भाजपच्या (BJP) माजी शहराध्यक्षांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विविध संघटनांचा विरोध, संत तुकारामांच्या भूमीवर ढोंगी बुवांना थारा न देण्याचे अंनिस (Anis) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) सोशल मीडिया सेल प्रमुखांचे आवाहन
'बागेश्वर धाम सरकार' (Bageshwar Dham Sarkar)या नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri)यांचा सोमवार, २० नोव्हेंबरपासून पुण्यात संगमवाडीच्या मैदानावर तीन दिवसांचा "दिव्य दरबार" सुरू होणार आहे. हनुमान कथा आणि "दिव्य दरबार" यांचा समावेश असलेला हा कार्यक्रम भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि नगरसेवक योगेश मुळीक यांनी आयोजित केला आहे. संगमवाडीच्या निकम मळ्यात. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तथापि, वारकरी संप्रदायातील एक महान संत कवी संत तुकाराम यांच्या विरोधात मागील वादग्रस्त विधाने आणि बाबांनी चमत्कारी शक्तींबद्दल केलेले अनेक दावे लक्षात घेता, विविध विवेकवादी गट आणि राजकीय पक्षांनी या कार्यक्रमाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हे शास्त्री आत्मे बोलावणे, वैद्यकीय चाचण्यांशिवाय आजारांचे निदान करणे, उपचार करणे, मन वाचणे आणि इतर विविध चमत्कार करत असल्याचा दावा करतात. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टींचा प्रचार महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या प्रतिमेच्या उलट असल्याचा दावाही विरोध करणाऱ्या संघटनांनी केला आहे.
पुण्यातील दरबाराला विरोध करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष शंतनू जगदाळे यांचाही समावेश आहे. भाजपशी सध्या घरोबा केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असूनही जगदाळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बागेश्वर बाबांच्या येण्याला विरोध करतानाच 'बुद्धीवादी संत कवी तुकारामांच्या भूमीत बागेश्वरसारख्या दांभिक व्यक्तीला स्थान नसल्याचे वक्तव्य केले आहे.
याआधी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रमुख श्याम मानव यांनी देखील शास्त्री यांच्या कथित चमत्कारांच्या दाव्यामुळे त्यांच्या महाराष्ट्रात उपस्थितीला विरोध केला होता.
श्याम मानव म्हणाले, "नागपूरच्या कार्यक्रमादरम्यान, आम्ही शास्त्री यांना त्यांचे चमत्काराचे दावे सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. सिद्ध न करू शकल्यास महाराष्ट्राच्या जादूटोणा विरोधी आणि काळ्या जादू कायद्यांतर्गत खटल्याचा सामना करावा लागेल, अशी तंबीही दिली होती. शास्त्री यांनी सुरुवातीला हे आव्हान स्वीकारले असले तरी, त्यांनी नियोजित कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी माघार घेतली आणि अचानक नागपूर सोडले. आम्ही महाराष्ट्राच्या जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत बागेश्वर बाबांविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. आम्ही त्यांच्या येण्याला आणि चमत्कारांच्या बिनबुडाच्या दाव्यांना विरोध करत राहू, असेही मानव म्हणाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) अध्यक्ष अविनाश पाटील सीविक मिररशी बोलताना म्हणाले, "आमच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. शास्त्री हे तर्कहीन दावे आणि चमत्कारांसाठी ओळखले जातात. अशा कार्यक्रमांविरोधात आम्ही न्यायालयात जाण्याचा विचारही केला आहे,असेही पाटील म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, "हे दिव्य दर्शनाचे कार्यक्रम म्हणजे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीचा खटाटोप आहे. राजकीय फायद्यासाठी मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा या राजकीय नेत्यांचा हेतू आहे. मूलभूत प्रश्नांसाठी सामान्य माणूस झगडत आहे,अशा बाबांचे दरबार म्हणजे मूळ मुद्द्याला बगल देण्याचा आणि लक्ष वळवण्याचा प्रकार आहे, दुसरे काही नाही, असेही पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन करणारे पुणे शहराचे भाजपचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांना विचारणा केली असता त्यांनी हा केवळ एक धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा असल्याचे म्हटले आहे. "बागेश्वर धाम सरकार यांना आपल्या शहरात आमंत्रित करण्यात आले आहे ते 'हनुमान कथा ' सादर करणार आहेत. कुणी म्हटले म्हणजे राजकीय हेतू असतो असे नाही नाही. जे लोक विरोध करत आहेत त्यांना आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. यावर मी कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही," असेही मुळीक म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.