खड्डा बुजवण्याऐवजी पालिकेचा खर्चाच्या खबरदारीचा फलक लावण्यावर भर
कात्रज-कोंढवा रस्त्याने रोज प्रवास करणाऱ्यांनी हे दृश्य नक्कीच पाहिले असेल. किती बरं काळजी घेतलीय, सर्वसामान्य पुणेकरांची. वाहने पुढे काही मिटर अंतरावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात आपटू नयेत यासाठी फलक लावून लोकांना सावध केले जात आहे. किमान १०००-१५०० रुपये खर्च करून, मजूर लावून, फ्लेक्स प्रिंट करून ही सुविधा तयार केली आहे. जो पुढे खड्डा आहे तो साधासुधा खोल नाही, तो आहे साधारण २ x २ फुटांचा आणि २० इंच खोल. दुरुस्त करायला काही मिनिटे आणि ५०० रुपये पुरेसे आहेत, पण आपण किती दक्ष आहोत, या नादात उच्चशिक्षित अभियंत्यांनी हा भीमपराक्रम केला आहे. स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांनी कपाळावर हात मारून या सुविधेचे स्वागत केले आहे.
पालिकेने कितीही दावे केले तरी कात्रज-कोंढवा रस्ता वापरणाऱ्या प्रवाशांना खड्डे आणि चिखलामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या भीषण अवस्थेमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढला असून, महापालिका प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना न केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पण पालिकेला चिंता मात्र या एकमेव 'खोल' खड्ड्याची आहे.
अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी लावलेले सेपरेटर काही ठिकाणी काढून टाकण्यात आले असून त्यामुळे पायी चालणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्ते विभाग त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाही.
या रस्त्याने अंदाजे ७००० ते ८००० वाहने रोज जातात. बहुतांश जड वाहने असून ट्रक आणि डंपर आहेत. संपूर्ण रस्ता अडथळ्यांची शर्यत आहे. रस्ता रुंदीकरण होईल तेव्हा होईल पण त्यापूर्वी तातडीने दुरुस्तीची मागणी स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी केली आहे.
सीविक मिररशी बोलताना, स्कूल व्हॅनचे मालक गणेश पवार म्हणाले, “कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली आहे आणि नियमित वाहतूक कोंडी होत आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अधिक कठीण होते. तसेच अपघातही वाढले आहेत. पण फलक एकच तथाकथित एक खोल खड्डाच का दिसतोय ते कळत नाही. जेवढा वेळ तो फलक लावण्यासाठी लागला असेल तेवढ्या वेळेत असे १०० खड्डे बुजवून झाले असते."
कात्रज डेपोजवळील रहिवासी मनीष वांजळे म्हणाले की, रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. पालिकेला हा एकच दिसला. लोक वेगमर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता खूप जास्त आहे. हा प्रकार या रस्त्यावर सातत्याने होत असून, महापालिकेने केवळ धोक्याचे फलक लावले आहेत मात्र रस्ता सुरक्षित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे."
अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, “आम्ही रस्त्याच्या कामावर सतत लक्ष ठेवून आहोत. पालकमंत्र्यांनीही या रस्त्याची पाहणी केली असून त्यावर नव्याने खड्डे पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल. हे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. सर्व औपचारिकता पूर्ण केल्या असून मार्चपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. रस्त्यावरील वाहतूकही लवकरच सुरळीत होईल.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.