PMC : आता पडला खड्ड्यांचा पाऊस; रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा ठरला फोल

वाहने चालवताना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रासले असून महापालिकेला रस्त्यांवर पडलेले खड्डे आवडत आहेत का?, खड्डे काय नागरिकांचा जीव घेण्यासाठी ठेवले आहेत का ? असे संतापजनक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 2 Oct 2023
  • 03:47 pm

आता पडला खड्ड्यांचा पाऊस

खड्डयातून शोधावा लागतो रस्ता

पुणे शहरात पावसाला सुरवात होताच रस्त्यांवर खड्ड्यांचे पुन्हा एकदा साम्राज्य दिसू लागले आहे. पालिकेने काही दिवसांपूर्वीच शहरासह उपनगर भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. मात्र पुन्हा पावसाने दणका दिल्याने महापालिकेच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. वाहने चालवताना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रासले असून महापालिकेला रस्त्यांवर पडलेले खड्डे आवडत आहेत का?, खड्डे काय नागरिकांचा जीव घेण्यासाठी ठेवले आहेत का ? असे संतापजनक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

पावसाने गेल्या आठ दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे नागरिक सुखावले आहेत. पुण्यातील धरणे देखील भरली आहेत. असे आनंदाचे वातावरण असले तरी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यातून मार्ग काढत नोकरीच्या ठिकाणी पोहचताना नागरिकांच्यात डोळ्यांत पाणी येत आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकने करोडो रुपये खर्च केले आहेत. परंतु पावसाचे आगमन होताच पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. तसेच रस्त्यावर गुडघ्या इतके पावसाचे पाणी साचत आहे. यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने रस्त्याच्या मधेच बंद पडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडी देखील सहन करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेला जर रस्त्यांवर खरेच खड्डे दिसत असतील तर ते तात्काळ बुजवण्यात यावेत. अन्यथा रस्त्यावर उतरुन पालिकेच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी ६ पॅकेज, ३०० कोटी रुपये खर्चाची तरतुद...

शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे वाहन चालक मेटाकुटीला आले होते. वाहतूक कोंडीने श्वास कोंडला जात होता. नागरिकांच्या तक्रारी नंतर महापालिका प्रशासनाने एका खासगी संस्थेमार्फत  शहातील रस्त्यांची पाहणी केली होती. यामध्ये रस्त्यांची कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार १०० किलोमिटर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रस्ते दुरुस्तीसाठी ६ पॅकेज तयार करण्यात आले आहेत. महापालिकेने ३०० कोटी रुपये खर्च करून १०० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक ते सहा असे पॅकेज करून त्यामध्ये रस्त्यांची विभागनी केलेली आहे. फेब्रुवारी महिन्यात या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यातील  पॅकेज दोन मधील २० किलो मीटर रस्त्यांचा समावेश असून ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. सलग रस्त्यांचे डांबरीकरण न करता ज्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात रस्ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी डांबराचे पॅच मारुन तेवढ्याच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र तेथेही आता होत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी खर्च केलेले पैसे पाण्यात वाहून गेल्याची खंत पुणेकर आता व्यक्त करु लागले आहेत.

दोन हाणा पण स्मार्ट सिटी म्हणा....

पुणे- बंगळुरु महामार्गावरील बाबधन येथील सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. या रस्त्यावर जाताना एका जेष्ठ नागरिकांचा खड्ड्यात पडून अपघात झाला. या अपघातात त्याचा जीव गेला असता. काही दिवसापूर्वीच हा रस्सा तयार करण्यात आला होता. मात्र लगेच खड्डा पडला आहे. केवळ जाहिरात करण्यात प्रशासन खर्च करत आहे. माणसांचे जीवाचे यांना पडलेले नाही. दोन हाणा पण स्मार्ट सिटी म्हणा, अशी गत आपल्या शहराची झाली आहे.

 - राज जाधव, विद्यार्थी कॉंग्रेस, अध्यक्ष कोथरुड विधानसभा.

गेल्या तीन महिन्यात ७, ७३९ खड्डे बुजवल्याचा केला होता दावा

शहरातील १०० किलो मीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत 7 हजार 739 खड्डे बुजविले आहेत. 355 चेंबरची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडुन करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन युध्द पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम करत आहे. असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. रस्त्यांवर खड्डे दिसले तर  ९०४९२७१००३ या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारी करावी असे पालिकेने आवाहन केले आहे.

महापालिकेने रोड अॅक्शन पथक नेमले, कोणाला नाही दिसले

शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी 24 तास एक रोड अॅक्शन पथक महापालिकेने नेमले आहे. पथकाकडून रस्त्यांची पाहणी करण्यात येते. चेंबर तुटले असेल, रस्ता खचला असेल, किंवा कोणी खोदाई करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यावर लक्ष ठेवले जाते. तसेच वेळीच कामे पूर्ण केली जातात. असे पालिकेकडून सांगण्यात येते. मात्र असे कोणते पथक आहे का? असेल तर ते दिसत नाही. असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. पथकाला त्यांची जबाबदारी समजली नसेल तर पालिकेने समजून सांगावी, तसेच रस्त्यांवर पडलेले खड्डे तरी किमान उघड्या डोळ्यांनी पाहावेत. नेमलेले पथक नेमके कोठे असते याची माहिती पालिकेने द्यावी. खड्ड्यात पडून कोणाचा जीव गेला तर त्याला महापालिकाच जबाबदार असणार आहे. असे केशवनगर येथील शिवसेनेचे अमर देखमुख यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून वेगाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. युध्द पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम केले जाणार आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.

   - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

महापालिकेत प्रशासक बसल्यापासून शहराची दयनीय अवस्था झाली आहे. कागदोपत्री रस्त्यांची कामे करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणारच यापेक्षा दुसरी काय अपेक्षा ठेवणार आहोत. महापालिकेच्या आयुक्तांनी आता केवळ कार्यालयात न बसता रस्त्यावरुन काम करावे. येत्या १५ दिवसांत जर खड्डे बुजवले नाहीत तर राष्ट्रवादीकडून शहारात मोठे आंदोलन उभारले जाईल.

 - प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

महापालिकेचे मोठ्या प्रकल्पांकडे लक्ष आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची जबाबदारी असते, याचा विसर पालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने याचा जाब अधिकाऱ्यांना कोणी  विचारत नाही. आणि सामान्य माणूस जाब विचारण्यासाठी त्याच्या कामामुळे जाऊ शकत नाही. पालिकेने जबाबदारीचे भान राखून वेळीच उपाययोजना कराव्यात.

 - सुरेंद्र पठारे, सामाजिक कार्यकर्ता.

सध्या पुण्यात जिथे जाऊ तिथे रस्त्यावर खड्डे पडलेले दिसतात. स्मार्ट सिटी अशीही असू शकते, यावर एक पुणेकर म्हणून विश्वास बसत नाही. उपनगर आणि नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या भागामध्ये तर भयानक परिस्थिती आहे.

- अविनाश खंडारे, सामाजिक कार्यकर्ता

अनेक वेळा तक्रारी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाला सामान्य जनतेचे काहीही पडलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने कामे होत नाहीत. यंत्रणा मोडकळीस आली आहे. खड्डे बुजवण्याचे काम देखील होत नाही.

 - रोहन देसाई, प्रमुख- कोरेगांव पार्क रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest