पुण्यातील तरुणाचे अपहरण
जर्मनीतील कंपनीच्या आभासी चलनात काही जणांनी गुंतवणुक केली होती. मात्र, यावर परतावा मिळत नसल्याने तरुणाचे अपहरण केले. अपहरणानंतर तरुणाला फलटणमधील एका हॉटेलमध्ये ठेवून ६५ लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी अजिंक्य प्रताप कदम, वैभव भारत कदम, श्रेयस कदम, राहुल निंबाळकर, मनोज भगत, अभिमन्यू घनवट (सर्व रा. फलटण, जि. सातारा) यांच्यासह तीन साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जर्मनीतील डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटीन वर्ल्ड या कंपनीच्या आभासी चलनात गुंतवणूक केली होती. मात्र, आभासी चलन भारतीय चलनात रुपांतरित होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे आरोपींचा तरुणाशी वाद झाला. त्यानंतर पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमधून तरुणाचे अपहरण केले.
अपहरणानंतर आरोपींनी तरुणाला फलटण येथील लॉजमध्ये रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर तरुणाकडे ६५ लाख रुपयांची मागणी केली आणि धमकावून जमिनीचे खरेदीखत करून घेतले. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.