Pune Station road : नाव मोठे, पण 'लक्षण खोटे'; नेहरू मेमोरियल हॉल ते पुणे स्टेशन रस्त्यावरील चुकीच्या दुभाजकामुळे वाढले अपघात

पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लष्कर परिसरातील नेहरू मेमोरियल हॉल पुणे स्टेशन परिसरातील अलंकार सिनेमागृह चौकापर्यंतचा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. या रस्त्यावर पोलीस आयुक्त कार्यालय, पोस्ट मास्टर जनरल यांचे कार्यालय, साधू वासवानी मिशन, प्राप्तिकर विभागाचे कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, पीएमपीएमएलचा डेपो अशी अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 6 Oct 2023
  • 11:04 am
Pune Station road : नाव मोठे, पण 'लक्षण खोटे'; नेहरू मेमोरियल हॉल ते पुणे स्टेशन रस्त्यावरील चुकीच्या दुभाजकामुळे वाढले अपघात

नेहरू मेमोरियल हॉल ते पुणे स्टेशन रस्त्यावरील चुकीच्या दुभाजकामुळे वाढले अपघात

नेहरू मेमोरियल हॉल ते पुणे स्टेशन रस्त्यावर आहेत केवळ खड्डे आणि पसरलेली खडी

लक्ष्मण मोरे

पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लष्कर परिसरातील नेहरू मेमोरियल हॉल पुणे स्टेशन परिसरातील अलंकार सिनेमागृह चौकापर्यंतचा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. या रस्त्यावर पोलीस आयुक्त कार्यालय, पोस्ट मास्टर जनरल यांचे कार्यालय, साधू वासवानी मिशन, प्राप्तिकर विभागाचे कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, पीएमपीएमएलचा डेपो अशी अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. अनेक व्यक्तींची या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. हा रस्ता व्हीआयपी रस्त्यापैकी एक असल्याचे सांगितले जाते. मात्र, सद्यस्थितीत या रस्त्याचे नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी गत झाली आहे. चौकाचौकात पडलेले खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी, चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेले दुभाजक यामुळे दिवसागणिक दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेक वाहनचालक गंभीर जखमी झालेले आहेत. याकडे मात्र प्रशासन लक्ष देऊन कार्यवाही करायला हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.

केवळ उपनगरांमध्येच नव्हे तर शहराच्या मध्यवस्तीतील प्रामुख रस्त्यावर देखील खड्डे, चुकलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरची उदाहरणे जागोजाग दिसत आहेत. नेहरू मेमोरियल हॉल रस्ता ते पुणे स्टेशन या रस्त्यावर देखील पदोपदी वाहन चालकांची हाडे खिळखिळी करण्याची पुरती खबरदारी प्रशासनाने घेतल्याचे दिसत आहे. नेहरू मेमोरियल हॉल चौकामधून लाल देवळाच्या दिशेने जाताना मोठाले खड्डे लागतात. या खड्यांमध्ये अनेकदा वाहने आदळतात. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकांची अन्य वाहनांना धडक बसण्याची शक्यता असते. या रस्त्यावरून बस, टेम्पो, ट्रक आदी जड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे गंभीर आणि प्राणघातक अपघाताचा धोका संभवतो. या ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी खडी पसरविण्यात आलेली आहे. त्यावर ना नीट डांबर घातले आहे, ना त्यावर रोडरोलर फिरवलेला आहे. ही खडी संपूर्ण चौकात पसरलेली असल्याने वाहने घसरून किरकोळ अपघात घडत आहेत.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने जाताना खड्डे तर लागतातच. परंतु, पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरच असलेला गतिरोधक उखडलेला आहे. त्याची खडी रस्त्यावर पसरली आहे. याठिकाणी देखील खड्डे आणि रस्त्याला घातलेली ठिगळे अपघातांना निमंत्रण देत आहेत. साधू वासवानी चौकातदेखील वळणावरच खड्डे पडले आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलच्या बस आणि लहान- मोठी वाहने हे खड्डे चुकविताना एकमेकांना घासतात किंवा धडकतात. अनेक दिवसांपासून पडलेले हे खड्डे कधी दुरुस्त होणार, असा सवाल वाहन चालक करीत आहेत.

साधू वासवानी चौकापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत रस्त्याच्या मधोमध लोखंडी दुभाजक घालण्यात आलेले आहेत. महिन्या-दीड महिन्यांपूर्वी हे दुभाजक या ठिकाणी बसविण्यात आले. हे दुभाजक बसविल्यानंतर वाहतूक कोंडी कितपत कमी झाली हे सांगता येत नसले तरी दररोज अपघात मात्र घडत आहेत. मागील आठवड्यात एक दुचाकी चालक या दुभाजकाला धडकून जखमी झाला होता. त्यापूर्वी एक मोटार या दुभाजकाला धडकल्याने नुकसान झाले होते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एक ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात दुभाजकाचा पुढचा भाग तुटून रस्त्यावर पडला. तसेच, ऑटो रिक्षाचे मात्र मोठे नुकसान झाले. संपूर्ण रिक्षा चेपली होती. रिक्षा चालकाच्या पायाला, हाताला डोक्याला गंभीर मार बसला. त्याला स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र फुटलेल्या काचा पसरलेल्या होत्या. हा दुभाजक चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेला आहे. हा दुभाजक सहसा दृष्टीस पडत नाही. त्याच्यावर रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत. इथेच पीएमपीएमपीचा थांबा असल्याने रस्त्यावर बस उभ्या राहतात. त्यामुळे हा दुभाजक दिसत नाही. बसच्या मागून आलेली वाहने उजव्या बाजूने पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुभाजकाला धडकतात. हा दुभाजक तत्काळ हटविण्याची मागणी केली जात आहे.

अलंकार सिनेमागृह चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी देखील जुजबी पद्धतीने खड्डे बुजविण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. त्या खडीमध्ये डांबर नावाचा पदार्थ शोधावा लागतो. चौकात ठिकठिकाणी पसरलेल्या खडीमुळे वाहनाचालकांची कसरत होत आहे. तोल सावरत गाडी चालवावी लागते. याठिकाणी देखील अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, प्रवासी, शासकीय अधिकाऱ्यांची वर्दळ असते. एकंदरीतच हा संपूर्ण रस्ता धोकादायक बनला असून पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची आणि दुभाजक हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest