खासदार नीलेश लंके कुख्यात गजा मारणेच्या घरी; गुंडाकडून सत्कार स्वीकारल्याप्रकरणी लंके यांच्याकडून तकलादू स्पष्टीकरण

अहिल्यादेवी नगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) खासदार नीलेश लंके यांनी पुण्यातीलकुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे ऊर्फ महाराज याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली

Nilesh Lanke

खासदार नीलेश लंके कुख्यात गजा मारणेच्या घरी

अहिल्यादेवी नगरचे (Ahilyadevi Nagar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातीलकुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे ऊर्फ महाराज (Gajanan Marne) याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्याच्याकडून सत्कार देखील स्वीकारला. यावरून खासदार लंके यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मारणेच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर या घटनेचे व्हीडीओ प्रसारित झाले. याप्रकरणी लंके (Nilesh Lanke) यांनी ‘‘मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. रस्त्याने जाताना त्यांनी हात केला आणि मी त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो,’’ असे तकलादू स्पष्टीकरण दिले आहे. पुणे पोलीस याविषयी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

गजा मारणेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणेने खासदार लंके यांचा सत्कार केल्याची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नामचीन गुंडांची परेड घेतली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. याविषयी राजकीय वर्तुळातून टीका झाली होती. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरणदेखील दिले होते. त्यातच आता पुन्हा खासदार नीलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गजा मारणे आपले राजकीय संबंध प्रदर्शित करून पोलिसांना आव्हान देत आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest