रस्त्याच्या मधोमध मेट्रोचा जिना ? येरवड्यात झाला रस्ता अरुंद
दिलीप कुऱ्हाडे
येरवडा येथील महामेट्रोच्या स्थानकावरील जिना रस्त्याच्या मधोमध उभारला जात आहे. या जिन्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अरुंद होत आहे. यासह रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन भविष्यात येरवड्याकडे जाण्या व येण्यासाठी मोठी समस्या येऊ शकते, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) येरवडा मेट्रो स्थानकाचा जिना आणि लिफ्ट रस्त्याच्या मधोमध बांधले जात आहे. त्यामुळे येरवडा बस थांब्याच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जागा शिल्लक असताना महामेट्रोने मध्येच जिना उभारला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने परवानगी दिली नसतानाही मेट्रो जिना उभारत असल्याचे समोर आले आहे. जिन्याचे बांधकाम काढून घेईपर्यंत मेट्रोचे काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे महामेट्रोने चार दिवसांपासून स्थानकाचे आणि जिन्याचे काम बंद केले आहे.
पर्णकुटी चौकातून गाडीतळकडे वळताना पंधरा फूट रस्त्यावर महामेट्रोने कॉलम उभारल्यामुळे येरवड्याकडे जाताना अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय रस्त्याच्या मधोमध जिना बांधल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी पर्णकुटी चौकातून येणाऱ्या वाहनांची जिनाच्या बांधकामाजवळ सातत्याने कोंडी होते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे मेट्रो स्थानकासाठी गाडीतळ चौकात उभारणारा जिना स्थलांतर करून मागील बाजूस बांधावा अशी मागणी नागरिक मेट्रोकडे करत होते, पण महामेट्रोने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे माजी नगरसेवक अड. अविनाश साळवे, माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, सामाजिक कार्यकर्ते डॅनिअल लांडगे आणि स्थानिक नागरिकांनी गेल्या आठवड्यात मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम बंद पाडले. दरम्यान मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा केली, पण नागरिक जिना स्थलांतर करण्यावर ठाम राहिल्याने अधिकारी निघून गेले. काम बंद झाल्याची दखल घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी अधिकाऱ्यांसोबत येरवडा स्थानकाला भेट दिली. त्यानंतर रस्त्याची रुंदी मोजमाप करून नकाशाची पाहणी करून आढावा घेतला.
माजी नगरसेवक अॅड. अविनाश साळवे म्हणाले की, “नगर रस्त्यावर मेट्रो स्थानकाशेजारी जिना आणि लिफ्ट रस्त्याच्या मधोमध बांधले जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय येरवडाकडे जाणाऱ्या वळणावर रस्त्यावर कॉलम टाकून रस्ता अडविला आहे. यामुळे भविष्याचा विचार करून मेट्रोने जिना काढून मागील बाजूस बांधावा ही मागणी आहे.”
महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे म्हणाले की, “स्थानिक नागरिकांनी जिना आणि लिफ्टच्या कामाला विरोध करून काम बंद पाडले आहे. मेट्रोच्या तांत्रिक पथकाकडून पुन्हा जागेची पाहणी केली जाणार आहे. महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.