पक्ष्याच्या धडकेमुळे मेट्रो सेवा ठप्प; दुरूस्तीनंतर २१ मिनिटांनी सेवा सुरळित
ईश्वरी जेथे/ निखिल घोरपडे
पुण्यातील मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी आदळल्याने वनाज ते रुबी हॉल मार्गावरील सेवा २१ मिनिटांसाठी ठप्प झाली. नळस्टॉप स्थानकावरच मेट्रो थांबवून ठेवावी लागली. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी हा प्रकार घडला. ओव्हरहेड केबलवर पक्षी आदळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या २१ मिनिटांत तांत्रिक त्रुटी दूर करून वीजपुरवठा सुरळित केला. मात्र, त्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली.
नळस्टॉप स्टेशनवर मेट्रोचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडता आले. मेट्रो प्रशासनाने उद्घोषणेद्वारे दिलगिरी व्यक्त करत प्रवाशांना या प्रकाराची माहिती दिली. त्याचबरोबर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या मेट्रोमधूनवनाज स्थानकापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली.
वनाझ रुबी हॉल मार्गावर मेट्रो सेवेत व्यत्यय येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी याच मार्गावरील मेट्रो सेवा २० मिनिटांसाठी खडित झाली होती. त्यामुळे मेट्रोच्या पायाभूत सुविधांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची तसेच पक्ष्यांची धडक बसून अपघात होऊ नये यासाठी सुरक्षेचे उपाय करण्याची गरज आहे.
मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या वृषाली कुठे यांनी सांगितले की मी रुबी हॉल स्टेशनवर सुमारे ७ मिनिटे मेट्रोची वाट पाहत होते. अचानकमेट्रो सेवेच्या विलंबाची घोषणा झाली. त्यामुळे मी मेट्रो स्टेशनवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माझ्या तिकिटाचा खर्च वाया गेला. हर्षद भोसले या प्रवाशाने सांगितले की, मी पीएमसी स्टेशनवरून रुबी हॉल क्लिनिककडे जात होतो. अचानक मेट्रोने घोषणा केली की तांत्रिक समस्या उद्भवली आहे. त्यामुळे मेट्रो थांबवण्यात येत आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांना सतर्क करण्यात आले. सेवा सुरळित होईपर्यंत स्टेशनवर थांबा किंवा दुसऱ्या वाहनाने प्रवास करा, असे सांगण्यात आले.
'सीविक मिरर'शी बोलताना पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (जनसंपर्क आणि प्रशासन) डॉ. हेमंत सोनवणे म्हणाले, मंगळवारीसंध्याकाळीवनाज ते रुबी हॉल मार्गावरील मेट्रो ट्रेनच्या ओव्हरहेड केबलला एक पक्षी आदळला. त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. ज्या ठिकाणी हा पक्षी आदळला त्याचा माग काढून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. याबाबतच्या तांत्रिक त्रुटींवर मेट्रोकडून लवकरच उपाययोजना केल्या जातील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.