Maval : ढाक बहिरीच्या डोंगरात चुकलेल्या सहा जणांना शोधण्यात यश

मावळ तालुक्यातील ढाक बहिरीच्या ट्रेकसाठी गेलेले सहा तरुण जंगलात हरवले. या सहा तरुणांना शोधण्यात यश आले आहे. ढाक बहिरी ट्रेकिंग दरम्यान एकापाठोपाठ चार ग्रुप वाट भरकटले आहेत. त्यामुळे या मार्गावर ट्रेकिंगला जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 3 Oct 2023
  • 01:44 pm
Maval : ढाक बहिरीच्या डोंगरात चुकलेल्या सहा जणांना शोधण्यात यश

ढाक बहिरीच्या डोंगरात चुकलेल्या सहा जणांना शोधण्यात यश

मावळ तालुक्यातील ढाक बहिरीच्या ट्रेकसाठी गेलेले सहा तरुण जंगलात हरवले. या सहा तरुणांना शोधण्यात यश आले आहे. ढाक बहिरी ट्रेकिंग दरम्यान एकापाठोपाठ चार ग्रुप वाट भरकटले आहेत. त्यामुळे या मार्गावर ट्रेकिंगला जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीपाद तगलपल्लेवार, क्षितीज गजभिये, अन्शुळ शेंडे, शुभम वाघ, कुणाल ठाकुर, आशिष ठाकरे (सर्व मूळ रा. नागपूर) यांना शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोधले आहे.

वरील सहा जणांचा ग्रुप रविवारी (दि. 1) ढाक बहिरीच्या ट्रेकिंगसाठी गेला. हे सर्व तरुण मूळचे विदर्भातील असून ते नोकरीनिमित्त पुण्यामध्ये आले आहेत. रविवारी सकाळी या ग्रुपने डोंगर चढण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळच्या वेळी ते रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास त्यांनी 100 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर रायगड मधील कर्जत, पुणे ग्रामीण मधील कामशेत पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा या संस्थेला माहिती दिली.

शिवदुर्गचे सुनिल गायकवाड, महेश मसने, योगेश दळवी, कपिल दळवी, अमोल सुतार, ओंकार पडवळ, सागर कुंभार, योगेश उंबरे, आनंद गावडे, प्रणय अंबुरे, कामशेत पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, आणि पोलीस पाटील यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तरुणांशी संपर्क करून एकाच ठिकाणी बसून राहण्यास सांगितले. पोलिसांच्या मदतीने तरुणांचे नेमके लोकेशन घेण्यात आले.

स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या सहा तरुणांना शोधून जंगलातून सुखरूप बाहेर आणले. त्यावेळी या तरुणांना चालताही येत नव्हते. संततदार पाऊस, दाट धुके, अंधार, शेवाळलेल्या पायवाटा असा अडचणींचा डोंगर उतरून मध्यरात्री साडेबारा वाजता सहा जणांना खाली आणण्यात यश आले.

ढाक बहिरीच्या ट्रेकिंग दरम्यान रस्ता चुकण्याच्या घटना वारंवार होत आहेत. सलग चार घटना घडल्या असून शिवदुर्ग रेस्क्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांना शोधण्यात यश आले आहे. मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी या मार्गावर ट्रेक करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest