मतदान, मतमोजणीवेळी मद्यविक्री बंद; जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आदेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर ठराविक भागात ठराविक काळासाठी निर्बंध लादले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने याचे आदेश काढले असून मद्य विक्री बंद ठेवण्याचे दिवस नक्की केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर ठराविक भागात ठराविक काळासाठी निर्बंध लादले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने याचे आदेश काढले असून मद्य विक्री बंद ठेवण्याचे दिवस नक्की केले आहेत. बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर मतदारसंघांसाठी हे आदेश असून त्याच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविल्या आहेत. ५ मे, ६ मे, ११ मे, १२ मे, १३ मे, ४ जून रोजी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे. ज्या भागात आदेशाचे उल्लंघन होईल, तेथील स्थानिक यंत्रणा त्यास जबाबदारी असेल असे आदेशात नमूद केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असून निवडणुका खुल्या, मुक्त, शांततेच्या, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात व्हावी,  कुठेही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी  निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हा आदेश काढला आहे. प्रत्येक टप्यातील मतदानाच्या दिवशी मतदान समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासूनच ही मद्यविक्री बंद असणार आहे. तसेच, मतमोजणीच्या दिवशी अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या / नियमांच्या तरतुदीनुसार ड्राय डे किंवा  कोरडा दिवस घोषित केला आहे. .

तिसऱ्या टप्यात पुणे जिल्ह्यातील बारामती आणि चौथ्या टप्यात मावळ, पुणे व शिरूर मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन, ताडी आदी प्रकारच्या मद्यविक्रीस मनाई केली आहे. बारामती, पुणे, मावळ, शिरूर मतदारसंघातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी (कारखाने) या कालावधीत उत्पादन सुरू ठेवू शकणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदींनुसार तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन १९५१ व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्र निरीक्षकांची असणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (DM Suhas Divse) यांनी आदेशात म्हटले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest