लॅपटॉप वापरायचा, पण चार्जिंगला मनाई; विद्यापीठातील ग्रंथालय प्रशासनाचा अजब फतवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालयाबाबत अजब निर्णय घेण्यात आला आहे. ग्रंथालयात विद्यार्थी आणि संशोधकांना लॅपटॉप वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लॅपटॉप चार्जिंग करण्यात ग्रंथालयात मनाई करणाऱ्या आदेशाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे, विद्यार्थी आणि संशोधकांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठात जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र आहे. जे पुर्वीचे जयकर ग्रंथालय वाचनकक्ष म्हणून ओळखले जाते. बुधवारी जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकांनी नवे मार्गदर्शक तत्वे जारी केली. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार, अनाधिकृतपणे वाचनकक्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात येईल. दंडाची रक्कम प्रथम वेळेस ५० रुपये, व्दितीय वेळेस १०० रुपये आणि तृतीय वेळेस १५० रुपये इतकी असेल. तसेच यापुढे सदर अनाधिकृत सदस्यास विद्यापीठात कोठेही प्रवेश वा अन्य सुविधा नाकारण्यात येईल. वाचनकक्ष हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. तेथे मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल. वाचनकक्षात लॅपटॉप वापरण्यास परवानगी आहे, परंतू चार्जिंग करण्यास मनाई आहे, असे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मात्र, संचालकांनी काढलेल्या नव्या आदेशाबाबत विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. आता विद्यापीठातील सर्वच विभागात इलेक्ट्रिक चार्ज करता येत असतील, तर मोबाईल फोन, लॅपटॉप यांसारख्या वस्तू का नाही ? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत युनिव्हर्सिटी स्टुडंट्स स्ट्रगल कमिटीचे समन्वयक आणि पीएच.डी. विद्यार्थी राहुल ससाणे म्हणाले की, “कोरोनानंतर संपूर्ण जग तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही संशोधन आणि शिक्षणात तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. अशा स्थितीत ग्रंथालयाचा नियम अतार्किक आहे. आम्ही या कृतीचा निषेध करतो आणि अशा विद्यार्थीविरोधी नियमाला विरोध करतो.”
विद्यार्थी स्वप्नील तांबे म्हणाला, “आजचे ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेले आहे. मोबाईल आणि लॅपटॉप या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू झाल्या आहेत. विद्यार्थी आणि संशोधक मोबाईल आणि लॅपटॉपवर ऑनलाइन व्याख्याने, शोधनिबंध आणि विविध विषयांवरील पुस्तके सहज मिळवू शकतात. अशाप्रकारे जयकर वाचनालयात मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगला बंदी घातल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ बसेल. एकीकडे डिजिटल इंडियाचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाला पूरक अशा गोष्टींना विरोध करायचा. विद्यापीठ सध्या दुतोंडी भूमिका घेत आहे.”
सीविक मिररशी बोलताना जयकर ग्रंथालयाच्या प्रभारी संचालक अपर्णा राजेंद्र म्हणाल्या, “जयकर वाचनालयाच्या नियमांची यादी विद्यापीठाच्या उच्चाधिकार समितीने तयार केली आहे. आम्ही फक्त विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत आहोत. यावर मी अधिक भाष्य करणार नाही.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.