Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोविड काळात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. अरुणा तारडे, डॉ. ऋषिकेश गार्डी यांच्याविरुद्ध गुन्हा

पुणे : महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोविड काळात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार २०२१ मध्ये कोरोना काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी घडला.

वारजे पोलीस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तारडे डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपापसात संगणमत केले. कोविड काळामध्ये कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता. या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्यसाथीदारांना हाताशी धरले.

सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार केले. खोटी कागदपत्रे तयार करून खरी असल्याचे भासवले. ही कागदपत्रे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोविड टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी केल्या. नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किड्स वापरल्या असल्याचे भासविण्यात आले.  त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकल्या. त्यामधून जवळपास ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जैतापूरकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest