चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या दोघांना अटक
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या दोन टोळक्यांना पोलीसांनी अटक केली आहे. या टोळक्यांनी कोरेगाव पार्कमधील लेन नं.५ येथील एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला हत्याराचा धाक दाखवून चंदनाची चोरी केली होती. बुधवारी पोलीसांनी दोघांना अटक केली.
फारूखाँ कदीरखाँ शोगन (वय २०, रा. जनजाला गाव ता. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) आणि सिराज निजाम लडावत (वय २२, रा. जनजाला गाव ता.सिल्लोड छत्रपती संभाजीनगर) अशी अटक कऱण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कोरेगाव पार्क लेन नं.५ येथील एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला हत्याराचा धाक दाखवून चंदनाची चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना चंदनाची झाडे चोरणारे दोन इसम दुचाकीवर कोरेगाव पार्क परिसरात चंदनाच्या झाडांची रेकी करत फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन विचारणा केली.
मात्र, सुरूवातीला दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावल्याने दोघांनाही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनी चंदनाच्या झाडांची चोरी केल्याची कबूली दिली. या दोघांकडून पोलीसांनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल आणि चंदनाच्या झाडाची चोरी केलेलेओंडके असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्यांच्यावर यापुर्वी असलेले कलम ३७९, ४२७ आणि कलम ३९५, ४१२, ३७९ असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा कोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.