केशवनगर - मांजरी रस्त्याची केली माती, खड्डे बुजवताना ठेकेदाराने डांबराऐवजी टाकला मुरूम
अमोल अवचिते
पिण्याच्या पाणी तसेच ड्रेनेज पाईलाईनचे काम केल्यानंतर केशवनगर-मांजरी रस्त्याचे पुन्हा डाबरीकरण न करता मुरूम टाकून रस्ता बुजवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना खड्ड्यांचा तसेच धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
केशवनगर गावात पिण्याच्या पाण्याची तसेच ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलाईन केशवनगर - माजरी रस्त्यावर टाकण्यात आली. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने हा रस्ता मुरूम टाकून बुजवला आहे. त्यामुळे आता या रस्त्यावरून जाताना नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. "महापालिकेने चांगल्या रस्त्याची माती केली असून एकीकडे पाण्याची सोय करून दिली, तर दुसरीकडे जीव घेण्याची व्यवस्था करून ठेवली,' असा घणाघाती आरोप गावकऱ्यानी केला आहे.
केशवनगर आणि मांजरी या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून या गावांना पायाभूत सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र महापालिकेकडून या सुविधादेखील मिळत नसल्याने गावकरी त्रासले आहेत. केशवनगरमध्ये लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे. यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिकेने पाण्याची व्यवस्था करून द्यावी, यासाठी गावकऱ्यांनी सातत्याने मागणी केली होती. तसेच अनेक वेळा आंदोलनेदेखील केली. त्यानंतर पालिकेकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र या पाईपलाईनचे काम करताना केशवनगर-मांजरी हा मुख्य रस्ता खोदण्यात आला होता. ठेकेदाराकडून पाईपलाईनच्या कामात दिरंगाई झाली. यामुळे येथील नागरिक त्रासले होते. "काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पुन्हा पूर्वीसारखा होईल, अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने डांबर टाकण्याऐवजी मुरूम टाकला. त्यामुळे आता पुन्हा या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास, सर्दी, घशाचे विकार आदी त्रास सहन करावा लागत आहे, अशी व्यथा येथील नागरिकांनी 'सीविक मिरर'कडे मांडली.
या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी केशवनगर भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आणि रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या विरोधात घोषणा देत अनोखे आंदोलन केले. यामध्ये अमर देशमुख, गिरीश गायकवाड, महेश जाधव, अतिश दळवी आदीनी सहभाग घेतला. या रस्त्यावरून केशवनगर, मांजरी, साडेसतरा नळी तसेच खराडीकडे जाता येते. त्यामुळे दिवसा आणि संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे धुळीचा मोठा त्रास येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुकानदार, पादचाऱ्यांचा श्वास कोंडला जात आहे. महापालिकेने लोकांचा जीव जाण्याची वाट न पाहता वेळीच रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने पिण्याच्या पाण्याची लाईन आणि ड्रेनेज लाईनच्या कामासाठी रस्ता खोदला होता. नागरिकांच्या हितासाठी रस्ता खोदल्यामुळे कोणीही विरोध केला नाही. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करून देणे ठेकेदारावर बंधनकारक असते. मात्र येथे मुरूम टाकून रस्ता बुजवण्यात आला. ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या उदासिनतेमुळे आता खड्ड्यातून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. आमची कोणतीही चूक नसताना धुळीचा प्रचंड त्रासदेखील सहन करावा लागत आहे. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तत्काळ रस्त्याचे डाबरीकरण करून द्यावे.
-अमर देशमुख, शिवसेना पदाधिकारी
मुढवा, केशवनगर, मांजरी रस्त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. केशवनगर - मांजरी रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच या रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याची खोदाई करावी लागेल, अशी कोणती कामे राहिली आहेत का, याचा आढावा घेतल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सरसकट डाबरीकरण करण्यात येणार आहे.
- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.