एमएनजीएलची पाइपलाईन झाली खराब, तब्बल ४०० नागरिकांचा गॅस पुरवठा खंडित
पुण्यातील येवलेवाडी, कात्रज परिसरातील तब्बल ४०० नागरिकांच्या घराचा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची सोमवारी दुपारच्या सुमारास पाइपलाईन फुटल्याने गॅस पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे, नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने याबाबत ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, येवलेवाडी कात्रजजवळ आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास एका एजन्सीमार्फत पुणे महापालिकेकडून ड्रेनेजचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे, गॅस पाइपलाइन खराब झाली. आपत्कालीन पथक दुरुस्तीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.
साधारण २-३ तासात गॅस पुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. शिवाय, झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर देखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, तीन ते चार तासानंतर फुटलेली गॅस पाइपलाईन दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे, येवलेवाडी कात्रजमधील बाधित भागात गॅस पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.